बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

पू. पंडित केशव गिंडे

रामनाथी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी २० ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमास सदिच्छा भेट दिली. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत नृत्यसाधना करणार्‍या होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद) यांनी पू. पंडित केशव गिंडे यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी अवगत केले. सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन पू. पंडित केशव गिंडे यांचा सन्मान केला. सन्मान सोहळ्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले या सोहळ्याला उपस्थित राहिले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या वेळी पू. पंडित केशव गिंडे यांच्या समवेत त्यांचे शिष्य श्री. सुरेश मयेकर आणि त्यांचा मुलगा कु. परंतप मयेकर हेही उपस्थित होते. (परंतप हे अर्जुनाचे नाव आहे. परंतप याचा अर्थ ‘योद्धा’, ‘तपाद्वारे जो इंद्रियांवर विजय मिळवतो, तो’, असा होतो.)

पू. पंडित केशव गिंडे यांनी आश्रम जिज्ञासेने पाहिला. आश्रमातील वास्तव्याच्या काळात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत क्षेत्रातील संशोधनकार्याविषयी त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतले.

पू. पंडित केशव गिंडे यांचा सन्मान करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ. बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पू. पंडित केशव गिंडे यांना आश्रमातील कार्याविषयी अवगत करतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

अ. पू. गिंडेकाका यांचे वय ८० वर्षे असूनही त्यांनी संपूर्ण आश्रम आवडीने आणि वेळ देऊन पाहिला. पू. काका आश्रमातील सर्व सेवांविषयी जिज्ञासेने जाणून घेत होते.

आ. पू. काका सुप्रसिद्ध बासरीवादक आहेत. असे असूनही ते आश्रमातील साधकांशी स्वतःहून संवाद साधत होते. ते सर्वांना विनम्रतेने हात जोडून नमस्कार करत होते. ‘मी तुमच्याकडून अजून शिकत आहे’, असे ते म्हणाले.

इ. ते प्रत्येक गोष्ट विचारून करत होते. आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, तसेच पालट पहातांना ‘वस्तूला हात लावू का’, अशा प्रकारे ते अत्यंत विनम्रतेने विचारत होते.

२. सनातन आश्रम आणि सनातनचे साधक यांच्याविषयी पू. पंडित केशव गिंडे यांनी काढलेले गौरवोद्गार !

‘सनातन प्रभात’विषयी जाणून घेतांना १. पू. पंडित गिंडे, २. श्री. सुरेश मयेकर, ३. कु. परंतप मयेकर आणि माहिती सांगतांना ४. होमिओपॅथी वैद्या (कु.) तिवारी

अ. ‘आश्रमातील आपतत्त्व वाढल्यामुळे काही ठिकाणच्या लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत’, याविषयी त्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले.

आ. आश्रमातील अन्नपूर्णा (स्वयंपाक) कक्षात आवश्यक त्या ठिकाणी यंत्रांचा वापर करण्यात येतो. ते पाहून ‘येथे साधना आणि आधुनिकता यांची योग्य सांगड घातली आहे’, असे पू. पंडित गिंडेकाका म्हणाले.

इ. सनातनचे साधक स्वतःकडून झालेल्या चुका स्वतःहून सांगतात. आश्रमातील साधक दोष आणि अहं निर्मूलनासाठी फलकावर चुका लिहितात, हे पू. गिंडेकाका यांना आवडले. ‘येथील सर्व साधक प्रामाणिक आहेत’, असे ते म्हणाले.

३. भगवान श्रीकृष्णाचे सनातन निर्मित चित्र, ध्यानमंदिरातील श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटना पाहून पू. पंडित केशव गिंडे यांनी काढलेले गौरवोद्गार !

अ. आश्रमाच्या स्वागतकक्षात भगवान श्रीकृष्णाचे सनातन-निर्मित चित्र आहे. ते पहाताक्षणीच पू. पंडित गिंडेकाका म्हणाले, ‘‘हा श्रीकृष्ण सजीव आहे. तो आपल्याशी बोलतो, असे वाटते !’’ प्रत्यक्षातही सनातनच्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना म्हणून बनवलेल्या या श्रीकृष्णाच्या चित्रात ३१ टक्के श्रीकृष्णतत्त्व असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे. (कलियुगात अधिकाधिक ३० टक्के इतकेच देवतेचे तत्त्व तिचे चित्र किंवा मूर्ती यांत आकृष्ट होऊ शकते.)

आ. आश्रमातील ध्यानमंदिरात श्री दुर्गादेवीची पितळीची मूर्ती आहे. ती मूर्ती पहाताक्षणीच पू. पंडित गिंडेकाका म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष दुर्गादेवी येथे आहे.’’

इ. आश्रमातील ध्यानमंदिरात करण्यात आलेल्या दत्तमाला मंत्राच्या प्रभावाने ध्यानमंदिराबाहेरील परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवली आहेत. ती रोपे पाहून पू. गिंडेकाका म्हणाले, ‘‘औदुंबराचे झाड असे कुठेही येत नाही. आश्रम परिसरात औदुंबराची पुष्कळ रोपे आहेत, ही खरंच ईश्वराची कृपा आहे.’’ पू. गिंडेकाका यांनीही दत्त संप्रदायानुसार पुष्कळ साधना केली आहे.

ई. हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवीने सनातनच्या आश्रमातील भिंतींवर तिच्या प्रभावळीने आशीर्वादस्वरूप लिखाण कोरले आहे. ते पहातांना सनातनच्या आश्रमाला अशा प्रकारे विविध देवतांचे आशीर्वाद लाभले आहेत, याचे पू. पंडित गिंडेकाका यांना कौतुक वाटले. ‘हा आश्रम वेगळाच आहे’, असे ते म्हणाले.

४. पू. पंडित केशव गिंडे यांचे शिष्य श्री. सुरेश मयेकर यांनी आश्रमातील साधकांचा पू. पंडित गिंडेकाका यांच्याविषयीचा भाव पाहून व्यक्त केलेला अभिप्राय !

अ. आश्रमात झालेल्या सत्संगात सनातनच्या दैवी बालकांनी पू. पंडित गिंडे यांना केवळ पाहूनच त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. सनातनच्या बालसाधकांचा पू. पंडित गिंडेकाका यांच्याशी पूर्वीचा परिचयही नाही. असे असूनही त्यांनी ओळखलेली गुणवैशिष्ट्ये पाहून श्री. सुरेश मयेकर भारावून गेले. ‘खरेच ही बालके दैवी आहेत’, असे ते म्हणाले.

आ. ‘आम्ही अनेक वर्षे पू. काकांसमवेत असूनही त्यांना ओळखू शकलो नाही. सनातनच्या साधकांचा पू. गिंडेकाका यांच्याप्रतीचा भाव, दैवी बालकांनी त्यांच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये यांतून आम्ही ‘आता संतांशी कसे वागायचे’, हे शिकू. पू. पंडित गिंडेकाका यांच्या गुरूंनीही सांगितले होते, ‘पू. गिंडेकाका कृष्ण आहेत.’ त्या वेळी ‘पू. गिंडेकाका बासरी वाजवतात; म्हणून गुरु त्यांना श्रीकृष्ण म्हणतात’, असा आमचा दृष्टीकोन होता. आता आपल्या साधकांचा त्यांच्याप्रतीचा भाव पाहून कळले की, गुरु म्हणतात त्याप्रमाणे ते खरेच संत आहेत.

५. ‘सनातन आश्रमासारखा आश्रम मी जगात कुठेच पाहिला नाही’, असे श्री. सुरेश मयेकर या वेळी म्हणाले.

संकलक : होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.१०.२०२१)

‘पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनाचा उपस्थितांवर कसा परिणाम होतो ?’, यासंदर्भातील संशोधनात्मक प्रयोग !

२१ ऑक्टोबर या दिवशी ‘पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनाचा उपस्थितांवर कसा परिणाम होतो’, यासंदर्भातील संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांतर्गत प्रथम पू. पंडित केशव गिंडे यांनी बासरीवर राग तोडी वाजवला. त्यांनी त्याच बासरीवर काही छिद्रे वाढवली होती, त्यांचा वापर करून प्रयोगाच्या दुसर्‍या सत्रात तोच राग (तोडी) वाजवला. त्यांनी स्वतः संशोधन करून जी १२ छिद्रांची बासरी सिद्ध केली आहे, त्यावर प्रयोगाच्या तिसर्‍या सत्रात यमन राग वाजवला. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)) यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली.

बासरीवादनाच्या या तीनही सत्रांचा उपस्थितांवर चढत्या क्रमाने सकारात्मक परिणाम दिसून आला. साधक बासरीवादनात तल्लीन तर झालेच, त्यासह त्यांना बासरीवादनाचा आध्यात्मिक स्तरावर लाभही झाला. ‘परमेश्वराने मला बळ द्यावे. मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यात माझा वाटा देईन’, असा मानस पू. पंडित केशव गिंडे यांनी व्यक्त केला.

सनातनच्या साधकांविषयी पू. पंडित केशव गिंडे यांनी काढलेले गौरवोद्गार !

दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित विज्ञापने न घेता केवळ साधकांची साधना म्हणून चालवले जाते. हे पू. गिंडेकाका यांना विशेष वाटले. ‘येथील सर्व साधक वेतन न घेता हे निस्वार्थ भावनेने सर्व करत आहेत, हे विशेष आहे’, असे ते म्हणाले.

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.१०.२०२१)