बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ६८३ जणांना अटक !

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी आतापर्यंत ६८३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मामुन मंडल याला अटक केली. आरोपी मामुन मंडल हा ‘इस्लामी छात्र शिवीर’ या संघटनेचा कार्यकर्ता आहे. ही संघटना जमात-ए-इस्लामी या कट्टरतावादी संघटनेची शाखा आहे. तसेच स्थानिक मौलवी उमर फारूख यालाही अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी मुख्य सूत्रधार शौकत मंडल याला अटक केली आहे. त्याने न्यायालयात दंगल भडकावल्याची स्वीकृतीही दिली आहे.

पीरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेशचंद्र यांनी सांगितले की, आरोपी मामुन याने पेट्रोल टाकून हिंदूंच्या घरांना आग लावली होती. नोआखालीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षा’च्या एका नेत्यासह ११ जणांना अटक केली.