उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आशुतोष लटपटे हा एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
(‘वर्ष २०१८ मध्ये कु. आशुतोषची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)
१. बालपणापासूनच सेवेची ओढ असणे
१ अ. आईसमवेत नेहमी सेवेला जाणे : ‘मी वर्ष २०१८ पासून प्रथमोपचार शिकवण्याची सेवा करते. तेव्हा आशुतोषही माझ्या समवेत प्रथमोपचार वर्गासाठी येतो. तो प्रत्येक प्रथमोपचार वर्गात न कंटाळता रुग्ण होण्याची सेवा करतो. त्याला गुरुकृपेने प्रथमोपचार सेवेतील झोळ्या वाहून नेण्याच्या पद्धती, तसेच प्रथमोपचाराच्या संदर्भातील अन्य कृती व्यवस्थित करता येतात. मी एखादी कृती विसरले, तर तो मला ते लक्षात आणून देतो.
१ आ. सेवेसाठी बराच वेळ बाहेर राहूनही वेळेवर अभ्यास करणे : वर्ष २०१९ पासून मी त्याची शाळा सुटल्यावर त्याला (त्याच्या दप्तरासह) सेवेला घेऊन जायचे. त्याने कधी ‘घरी जाऊया किंवा मला तुझ्या समवेत सेवेला यायचे नाही’, असे म्हटले नाही. तो सकाळी ८ वाजता शाळेत जायचा. दुपारी ३ वाजता त्याची शाळा सुटायची. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या कालावधीत तो माझ्या समवेत सेवेला येत असे. नंतर तो घरी गेल्यावर लगेच अभ्यासाला बसत असे.
२. समंजसपणा
२ अ. ‘आई घरी आल्यावर वाढदिवस साजरा करूया’, असे सांगणारा समंजस आशुतोष ! : मी जून २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात होते. तेव्हा त्याचा वाढदिवस होता. तो, त्याचे बाबा आणि दादा असे तिघे जण घरी होते. तेव्हा तो समंजसपणे म्हणाला, ‘‘आई घरी आली की, माझा वाढदिवस करूया.’’
२ आ. आई शिबिराला गेल्यावर आजोबांकडे आनंदाने रहाणे : ऑगस्ट २०१९ मध्ये मला प्रथमोपचार शिबिरासाठी जायचे होते. ‘या कालावधीत आशुतोषला कुठे ठेवायचे ?’, असा मला प्रश्न पडला होता. तेव्हा तो माझ्या मैत्रिणीकडे रहायला आनंदाने सिद्ध झाला. नंतर तो माझ्या वडिलांजवळ (आजोबांजवळ) घरीच राहिला. त्या वेळी तो आणि माझे वडील असे दोघेच घरी असायचे. तो प्रत्येक कृती आजोबांना विचारून करायचा. तो बाहेर खेळायला जातांनाही त्यांना विचारून जायचा. त्याच्या या समंजसपणाचे वडिलांनी पुष्कळ कौतुक केले.
३. प्रगल्भता
३ अ. ‘वर्गात प्रथमोपचारासंबंधी काय शिकवायचे ?’, याविषयी आईला योग्य दृष्टीकोन देणे : एकदा केंद्रामध्ये प्रथमोपचाराच्या तीनही ग्रंथांतील प्रात्यक्षिकांचे सराव झाले होते. तेव्हा ‘आता काय शिकवावे ?’, असा विचार मी करत होते. मी आशुतोषला सहज विचारले, ‘‘आता आपण यांना काय शिकवूया ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आई, आता तू त्यांना ‘आतापर्यंत शिकवलेल्या भागातील तुमच्या किती लक्षात आले ? आपण हा भाग शिकलो आहोत, तर तुम्ही यातील काही भाग करून दाखवता का ?’, असे विचार.’’ तेव्हा खरोखरच साधकांच्या काहीच लक्षात येत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा मी त्यांना प्रथमोपचारातील नाडीपरीक्षा, आरामदायी स्थिती हे विषय पुन्हा शिकवले. त्या वेळी साधकांचा उत्साह वाढला होता आणि त्यांना शिकतांना आनंदही मिळत होता.
३ आ. स्वतःच्या साधनेविषयी सतर्क असणे : तो माझ्या समवेत प्रत्येक सत्संगालाही असतो. एकदा ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकांनी कोणता नामजप आणि प्रार्थना करायच्या ?’, याविषयी चर्चा चालू होती. तेव्हा त्याने लगेच विचारले, ‘‘आई माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे, तर मी कोणता नामजप करायला पाहिजे ?’’
४. साधनेचे प्रयत्न मनापासून करणे
अ. एकदा तो सद्गुरु जाधवकाका यांच्या सत्संगाला आला होता. तेव्हा सद्गुरु काकांनी साधकांना ‘तुम्ही ध्यान लावता का ? आवरण काढता का ? बगलामुखी स्तोत्र ऐकता का ?’, असे प्रश्न विचारले. तेव्हा तो प्रत्येक प्रश्नाला हात वर करत होता.
आ. तो प्रतिदिन नामजप, प्रार्थना, मंत्रजप करणे, आवरण काढणे, सत्र करणे, या सर्व गोष्टी स्वतःहून करतो आणि त्याचा आढावाही देतो.
इ. सूर्यग्रहणाच्या दिवशी त्याने आश्रमात सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले. तो त्या दिवशी पाणीसुद्धा प्यायला नाही.
५. परेच्छेने वागणे
आशुतोष प्रत्येक गोष्ट स्वतःच्या आवडीने न घेता दुसर्यांच्या आवडीप्रमाणे घेतो. त्याला सायकल घ्यायची असेल किंवा कपडे घ्यायचे असतील, तर दादाला जो रंग आवडतो, तोच तो घेतो.
६. स्वतःचे स्वभावदोष विचारून त्यांवर मात करायला शिकणे
सद्गुरु जाधवकाकांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि स्वयंसूचना सत्रे यांचे महत्त्व सांगितले. त्या वेळी आशुतोषने मला ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ म्हणजे काय ? स्वयंसूचना कशा द्यायच्या ?’, हे सर्व विचारले. नंतर त्याने स्वतःचे स्वभावदोष विचारले. त्यानंतर त्याने त्याची चूक वहीत लिहिली, ‘मी ताटामध्ये भाजी शिल्लक ठेवली.’ दुसर्या दिवशी त्याने ताटातील भाजी प्रथम संपवली आणि घरी आल्यावर मला हे सांगितले. तेव्हा ‘चूक झाल्यावर त्यावर मात कशी करायची ?’, हे मला त्याच्याकडून शिकायला मिळाले.
७. आशुतोषने सांगितलेल्या भावप्रयोगाच्या वेळी भावजागृती होणे
एकदा मी त्याला म्हणाले, ‘‘तू भावप्रयोग घेशील का ?’’ तेव्हा त्याने फार सुंदर भावप्रयोग घेतला. त्याने भावप्रयोगात ‘रामनाथी आश्रमातील चैतन्यामुळे तेथील साधकच नव्हे, तर पशू-पक्षी आणि इतर सर्वही कसे आनंदी आहेत ?’, हे भावपूर्णरित्या सांगितले. त्याचा हा भावप्रयोग ऐकून माझी भावजागृती झाली.
‘हे भगवंता, या दैवी बालकाची आई होण्याचे सौभाग्य मला केवळ तुझ्याच कृपेमुळे मिळाले आहे. ‘त्याला सांभाळण्याचे दायित्व देऊन तू मला त्याच्याकडून शिकण्याची संधी देत आहेस’, त्यासाठी तुझ्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. हे भगवंता, ‘हे लिखाण तूच माझ्याकडून करवून घेतलेस’, त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अनिता लटपटे (आशुतोषची आई), संभाजीनगर (जून २०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |