चीनकडून सीमांंचे रक्षण करण्याच्या नावाखाली नवीन कायदा !

कुणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी  नवा कायदा केल्याचे चीनकडून सूतोवाच !

‘चोर तर चोर, वर शिरजोर’, या कावेबाज वृत्तीचा चीन ! – संपादक

बीजिंग (चीन) – चीनने स्वत:च्या सीमांचे रक्षण करण्यासाठी एक नवीन कायदा संमत केला आहे. चीनच्या ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’च्या (‘एन्पीसी’च्या) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला संमती दिली आहे. या कायद्याची कार्यवाही येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल. ‘चीनचे सार्वभौमत्व आणि सीमा सुरक्षित राखणे’, याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आमच्यावर कुणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा नवा कायदा करण्यात आला आहे’, असे चीनने म्हटले आहे.

१. चीनने या नव्या कायद्यात म्हटले आहे की, सीमा अधिक बळकट करण्यासाठी चीन सर्व प्रकारची उपाययोजना करणार आहे. सीमाभागातील लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यास प्राधान्य देण्यात येईल. सीमाभागात पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर उभारणी केली जात आहे. शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध राखण्याचे चीनचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर आम्ही भर देणार आहोत.

२. चीनची भूमिका कायम विस्तारवादी राहिली असल्याने त्याचे १२ देशांशी सीमातंटे चालू आहेत. त्यामध्ये भारतासह रशिया, मंगोलिया, ताजिकिस्तान, कझाकस्तान, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान आदी देशांचा समावेश आहे.