(म्हणे) ‘गोव्यासाठी ‘नवीन सकाळ’ निर्माण करू !’ – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ही नवीन सकाळ अजून बंगालमधील जनतेने कधी अनुभवली का ? त्यांनी हिंसाचाराचीच काळी रात्र अनुभवली ! – संपादक 

 

पणजी, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – मागील १० वर्षे भाजप शासनाच्या काळात गोमंतकियांनी खूप भोगले आहे. पुढील निवडणुकीनंतर आम्ही गोव्यात नवीन शासन आणून गोव्यासाठी ‘नवीन सकाळ’ निर्माण करू, असे आश्यासन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिले. त्या म्हणतात, ‘‘मी गोव्याला २८ ऑक्टोबर या दिवशी भेट देणार आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी प्रत्येक नागरिक, संघटना आणि राजकीय पक्ष यांनी संघटित व्हावे’, असे मी आवाहन करते.’’ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गोवा भेटीच्या वेळी गोव्यातील काही नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

विजय सरदेसाई युतीसाठी काँग्रेसच्या संपर्कात

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई त्यांच्या २ सहकारी आमदारांसह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चालू असतांनाच २३ ऑक्टोबरला काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तृणमूलच्या नेत्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करणेही बंद केले आहे. दिनेश गुंडू राव विजय सरदेसाई यांना त्यांच्या २ सहकार्‍यांसह तृणमूलमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. युतीविषयीही सरदेसाई आणि राव यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली; पण काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा युतीस विरोध आहे.