भारतभर राबवण्यात येणार्‍या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद !

‘तुम्ही करत असलेले अभियान पुष्कळ यशस्वी होईल !’ – देवीचा आशीर्वाद

उडुपी (कर्नाटक) – भारतभर राबवण्यात येणार्‍या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद लाभला.

कर्नाटक राज्यात सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला प्रारंभ करण्यापूर्वी उडुपी येथील धर्मप्रेमी श्री. आनंद अमिन हे श्री. सुधर्म यांच्याकडे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. तेव्हा श्री. सुधर्म यांनी विड्याचे पान वर उडवल्यावर पान खाली पडतांना पानाची वरची बाजू आकाशाच्या दिशेने होती. तेव्हा देवीने श्री. सुधर्म यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘तुम्ही करत असलेले अभियान पुष्कळ यशस्वी होईल. असे अमूल्य ग्रंथ प्रत्येक घराघरांत पोचले पाहिजेत. सनातन धर्माचा प्रसार सर्वत्र व्हायला हवा. या कार्याला माझे संपूर्ण आशीर्वाद आहेत. येथे येणार्‍या लोकांना मीही ग्रंथाचे महत्त्व सांगीन आणि तुम्हीही सांगा.’’

श्री महाकालीदेवीच्या मंदिराविषयीची माहिती उडुपी जिल्ह्यातील कटपाडी येथील कुदूरू गावामध्ये श्री महाकालीदेवीचे मंदिर आहे. या मंदिरात पूजाअर्चा करणारे श्री. सुधर्म यांच्यात गेल्या १३ वर्षांपासून श्री महाकालीदेवीचा संचार होतो. संचार झाल्यानंतर ते भविष्यवाणी करतात. त्यामुळे त्यांच्याकडे समस्या निवारणासाठी मंगळवार आणि शुक्रवार या दोन वारी अनुमाने ५०० हून अधिक लोक येतात.

येथे नवरात्रीच्या कालावधीत मोठा उत्सव असतो. देवीचा संचार झाल्यानंतर श्री. सुधर्म विड्याचे पान वर उडवतात. ते पान ज्याप्रमाणे खाली पडते, त्याप्रमाणे ते लोकांच्या समस्यांवर उपाय सुचवतात. त्यांच्याकडे येणार्‍या अनेकांच्या समस्या दूर झाल्या आहेत. यासाठी ते कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. कुणाला स्वेच्छेने अर्पण द्यायचे असल्यास ते तेथील मंदिराच्या दानपेटीमध्ये पैसे टाकतात.

सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार  अभियाना’विषयी थोडक्यात माहिती

सनातनचे ग्रंथ म्हणजे ईश्वरी चैतन्य, तसेच आनंद आणि शांती यांची अनुभूती देणारे साहित्य आहे. सनातनच्या ग्रंथातील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी सनातनच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. सनातनचे ग्रंथ समाजातील प्रत्येक जिज्ञासू, मुमुक्षू आदी जिवांपर्यंत पोचून त्यांनाही या ज्ञानशक्तीचा लाभ व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे.