पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टीचे पाडकाम रोखले !

आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल – २२ ऑक्टोबर या दिवशी नवीन पनवेल येथील भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला भाजपचे उत्तर रायगडचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोखून नागरिकांसह ‘ठिय्या आंदोलन’ केले. त्यामुळे या पथकाला कारवाई न करता माघारी जावे लागले.

नवीन पनवेल सेक्टर १ येथील शबरी उपाहारगृहाच्या बाजूला गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ १०८ झोपड्या असलेली भीमनगर झोपडपट्टी आहे. सिडकोच्या अधिकार्‍यांनी ही झोपडपट्टी अनधिकृत असल्याचे सांगत कोणतीही नोटीस न देता ती पाडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा नेला. याविषयी आमदार प्रशांत ठाकूर यांना समजताच ते स्वतः त्या ठिकाणी येऊन सिडकोचे पथक परत जाईपर्यंत तेथे बसून राहिले. या वेळी त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक आणि इतर मान्यवरही होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दूरभाष करून ‘या लोकांनी येथून उठून कुठे जायचे, याचा निर्णय प्रथम घ्या, मगच त्यांच्या झोपड्या पाडा’, असे सांगितले. त्यामुळे सिडकोचे पथक आणि पोलीस माघारी गेले.