अमली पदार्थविरोधी पथक पोचले अभिनेते शाहरूख खान यांच्या निवासस्थानी !

अभिनेते शाहरूख खान यांचे वांद्रे येथील निवासस्थान 

मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी २१ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या निवासस्थानी पोचले. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांकडून ‘शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलो आहोत’, असे सांगण्यात आले.

अमली पदार्थ सेवनाच्या प्रकरणी आर्यन खान याला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. मागील १८ दिवसांपासून आर्यन खान कारागृहात आहे. न्यायालयाने अद्याप त्याला जामीन संमत केलेला नाही.

अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या निवासस्थानीही अमली पदार्थविरोधी पथकाची धाड; चौकशीसाठी समन्स !

नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या निवासस्थानीही अमली पदार्थविरोधी पथकाने २१ ऑक्टोबर या दिवशी धाड घातली. आर्यन खान याने केलेल्या संभाषणामधून अमली पदार्थांच्या प्रकरणात आणखी काही नावे समोर आली आहेत. त्यामध्ये अनन्या पांडे यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अनन्या पांडे यांच्या निवासस्थानी धाड घातल्यानंतर त्यांना अमली पदार्थविरोधी पथकाने कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे समन्स पाठवले आहे.


आर्यन खान याच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ !

मुंबई – मुंबई सत्र न्यायालयातील अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान यासह अन्य ७ जणांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. आधीची न्यायालयीन कोठडी संपल्याने आर्यन खान आणि अन्य आरोपी २१ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणीसाठी विशेष न्यायालयात ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

२ ऑक्टोबर या दिवशी आर्यन खानसह अन्य आरोपींना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. २० ऑक्टोबर या दिवशी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खान याच्या जामिनाचा अर्ज फेटाळला. याला आर्यन याच्या अधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर २६ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे.