आता भारतीय सैनिक चिनी सैनिकांशी दंड, भद्र, वज्र आणि त्रिशूळ या शस्त्रांद्वारे लढणार !

गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याकडून नवीन शस्त्रांची निर्मिती

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – लडाखच्या गलवान खोर्‍यातील संघर्षामध्ये चिनी सैनिकांनी काटेरी तारेच्या लाठ्या, टेसर (विजेचा झटका देणारे एक उपकरण) यांच्या साहाय्याने भारतीय सैनिकांवर आक्रमण केले होते. त्यानंतर भारताने सैनिकांसाठी हातघाईच्या संघर्षांत प्रभावी ठरणारी दंड, भद्र, वज्र, त्रिशूल अशी शस्त्रे बनवली आहेत. त्यांचा उपयोग केवळ शत्रू सैन्याशी लढण्यासाठीच नाही, तर हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठीही होण्याची शक्यता आहे.

१. ही शस्त्रे नोएडाच्या ‘एपेस्ट्रॉन प्रा. लि.’ या आस्थापनाने बनवली आहेत. ‘एपेस्ट्रॉन’चे मुख्य अधिकारी मोहित कुमार यांनी ‘ए.एन्.आय.’ला माहिती देतांना सांगितले की, मागील वर्षी लडाखच्या गलवान खोर्‍यामध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या आक्रमणात भारताचे २० सैनिक हुतात्मा, तर चीनचे ४५ हून अधिक सैनिक ठार झाले होते. त्यानंतर आम्हाला भारतीय सैन्यदलासाठी अशा प्रकारची उपकरणे विकसित करण्यास सरकारने सांगितले होते.

२. कुमार यांनी सांगितले की, यातील कोणत्याही शस्त्रामुळे समोरच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा तिला गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाही. ही शस्त्रे शारीरिक संघर्षाच्या वेळी शत्रूच्या सैनिकांना तात्पुरत्या स्वरूपात प्रभावहीन करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. ही शस्त्रे सर्वसामान्य नागरिकांना विकली जाणार नाहीत.

सैन्यासाठी विकसित केलेल्या शस्त्रांची माहिती पुढीलप्रमाणे –

वज्र : वज्र नावाचे ‘मेटल रॉड टेजर’ (अणकुचीदार खिळ्यासारखा भाग असलेला लोखंडी दांडा) बनवण्यात आले आहे. याचा वापर शत्रूच्या सैनिकांवर आक्रमण करण्यासाठी, तसेच त्यांची बुलेटप्रूफ वाहने पंक्चर करण्यासाठीही करता येऊ शकतो. वज्रामध्ये ‘स्पाईक्स’ही (अणकुचीदार खिळे) असतात, जे विद्युत् प्रवाह ‘डिस्चार्ज’ (खंडित) करतात आणि शत्रूच्या सैनिकांना समोरासमोरच्या लढाईत त्यांना प्रभावहीन करू शकतात.

त्रिशूळ : याचा वापर वाहनांना थांबवण्यासह प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी थांबवण्यासाठी केला जाऊ शकतो.

सेफर पंच : थंडीमध्ये ‘सेफर पंच’ हातमोजासारखा घालता येतो. याचा वापर आक्रमण करणार्‍या शत्रूच्या सैनिकांना झटका देण्यासाठी करता येतो. हे ‘वॉटरप्रूफ’ (जलरोधक) असून ते ३० डिग्री तापमानातही उपयोगी ठरू शकतात. सेफर पंच विजेवर भारित केल्यानंतर अनुमाने ८ घंटे काम करू शकतात.

दंड : दंड ही वॉटरप्रूफ काठी असून ती विद्युत् भारित केल्यानंतर ८ घंटे काम करू शकते.

भद्र : ही एक प्रकारची ढाल आहे, जी सैनिकांचा दगडफेकीपासून बचाव करते. तसेच यात वाहणार्‍या विद्युत् प्रवाहामुळे शत्रूच्या सैन्याला जोराचा झटका बसू शकतो.