गोवा राज्यातील खासगी प्रवासी बसगाड्यांची दोडामार्गमध्ये वाहतूक चालू

शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या चेतावणीनंतर प्रशासनाची कार्यवाही !

दोडामार्ग – कोरोना महामारीच्या काळात गोवा राज्यातील खासगी प्रवासी बसगाड्यांना महाराष्ट्रात प्रवेश नव्हता; मात्र आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने २१ ऑक्टोबरपासून दोडामार्गमार्गे महाराष्ट्रात गोव्यातील खासगी बसगाड्यांना वाहतूक करण्यास अनुमती देण्यात आली आहे. ही सेवा चालू व्हावी, यासाठी शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनाला चेतावणी दिली होती. (प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी चेतावणी दिल्यानंतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करते, असे अनेक प्रसंग सध्या घडत असल्याचे दिसते, मग जनतेने चेतावणी देण्यापूर्वी प्रशासनाच्या लत या समस्या येत नाहीत कि जनतेने आवाज उठवल्याशिवाय समस्यांकडे बघायचेच नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे ? – संपादक)

कोरोनाच्या काळात गोवा राज्यातील खासगी बसगाड्यांना महाराष्ट्रात प्रवेश नव्हता. त्यामुळे दोडामार्ग येथील गोवा राज्याच्या पोलीस तपासणी नाक्यावर गोव्यातील बसगाड्या येऊन थांबत आणि तेथूनच पुन्हा माघारी जात असत. यामुळे गोव्यात प्रतिदिन कामावर जाणारे कामगार, तसेच इतर प्रवासी आणि गोव्यातून बाजारहाट करण्यासाठी दोडामार्ग येथे येणारे लोक यांची गैरसोय होत होती. त्यामुळे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनाला ‘२२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजेपर्यंत बससेवा करा अन्यथा त्यानंतर स्वत: पुढाकार घेऊन बससेवा चालू करू’, अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने धुरी यांच्या चेतावणीची नोंद घेत २१ ऑक्टोबरपासून गोवा राज्यातील खासगी प्रवासी बसगाड्यांना दोडामार्गमध्ये प्रवेश दिला.