श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी !

५ दिवसांची मंचकी निद्रा संपल्याने देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना !

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिरात करण्यात आलेली फुलांची सजावट

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २० ऑक्टोबर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा संपल्यावर देवीच्या मूळ अष्टभूजा मूर्तीची विधीवत् पूजा करून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. महिषासूर दैत्याचा वध करून नवरात्रीनंतर देवीची ५ दिवसांची श्रमनिद्रा कोजागरी पौर्णिमेला संपली. देवीच्या मूर्तीचे पंचामृत स्नान घालून धूप, आरती यांसह विधीवत् पूजन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिवर्षी भरणार्‍या आश्विन पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले होते. यानिमित्ताने भाविकांना शहरामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा बंदीसह अन्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

आश्विन पौर्णिमेच्या यात्रेसाठी प्रतिवर्षी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील लाखो भाविक श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येतात; मात्र या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांमुळे मोजक्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पौर्णिमेच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. २० ऑक्टोबरच्या रात्री सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या नंदीध्वजांसह छबिना मिरवणुकीने शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.