कायदा मोडणार्‍या कारखानदारांची शरद पवारांनी बाजू घेणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे ! – सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंढरपूर

सचिन पाटील

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १८ ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत साखर दरासाठी शेतकर्‍यांना ३ टप्प्यांत किमान मूल्य भाव देण्याविषयी घेतलेली भूमिका शेतकर्‍यांसाठी त्रासदायक आहे. गेल्या १० वर्षांपासून सातत्याने आंदोलन करून अनेक शेतकर्‍यांनी गुन्हे नोंद करून घेतले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी जीवही गमावला आहे. शेतकर्‍यांच्या त्यागातून हा कायदा सिद्ध झाला आहे. हा कायदा मोडण्यासाठी काही कारखानदार आणि सत्तेतील पुढारी सरकारची दिशाभूल करत आहेत. अशा लोकांची बाजू शरद पवारांनी घेणे म्हणजे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केला आहे.

सचिन पाटील पुढे म्हणाले, ‘‘शेतकर्‍यांनी उसाच्या पिकावरच रुग्णालय, पतसंस्था, शिक्षण यांसाठी कर्ज काढलेले आहे. त्यातच कोरोना, महापूर, अतीवृष्टी यांमुळे शेतकरी कोलमडून पडत आहे. त्यामुळे किमान मूल्य भावाची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद पवार यांना पत्र पाठवणार आहे. ’’