केंद्र सरकारचे ‘आयुध निर्माण मंडळ’ विसर्जित करून ७ आस्थापनांची निर्मिती

नवी देहली – ‘आयुध निर्माण मंडळ’ (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) विसर्जित करण्यात आले आहे. आता या मंडळाचे रूपांतर ७ आस्थापनांमध्ये करण्यात आले आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे केली. या मंडळाचे देशातील १० राज्यांतील ४१ ठिकाणी दारूगोळा आणि शस्त्र निर्मिती यांचे कारखाने आहेत. आता या सर्वांना ७ आस्थापनांमध्ये विभागण्यात आले आहे. सुमारे ७५ सहस्र कर्मचारी या मंडळात काम करत असून कुणालाही कामावरून न काढता यांना या आस्थापनांमध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील २ वर्षांत पूर्ण केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या मंडळाचे स्वातंत्र्यानंतर आधुनिकीकरण करणे आवश्यक होते. ते न केल्याने संरक्षणात्मक आवश्यकतेसाठी अन्य देशांवर अवलंबून रहायची वेळ आली. ‘या नव्या आस्थापनांसमवेत काम करण्यासाठी खासगी आस्थापनांनी पुढे यावे’, असे आवाहनही मोदी यांनी केले.