‘तनिष्क’ या सुप्रसिद्ध अलंकारांच्या आस्थापनातील अधिकार्यांना ‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार कसे ओळखावेत ?’, याविषयी ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिक दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
‘आर्ट ऑफ ज्वेलरी’ या राष्ट्रीय स्तरावरील अलंकारांविषयीच्या मासिकात मे २०१९ पासून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने अलंकारांविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती देणारी लेखमाला चालू आहे. या लेखांतील माहितीने प्रभावित होऊन त्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी ‘टाटा’ समुहाच्या ‘तनिष्क’ या अलंकारांविषयीच्या आस्थापनातील अधिकार्यांनी आम्हाला ७.६.२०२१ या दिवशी ‘ई-मेल’द्वारे संपर्क केला. त्यानंतर ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे त्यांना सात्त्विक अलंकारांविषयी सखोल माहिती देण्यात आली. यात त्यांचे ४ अधिकारी सहभागी झाले होते.
त्यानंतर सात्त्विक अलंकारांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या विषयाच्या सखोल अभ्यासाला आरंभ केला. ‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार ओळखता यावेत’, यासाठी १२.८.२०२१ या दिवशी त्यांना ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘अलंकारांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी कशा करायच्या ?’, याचे एक प्रात्यक्षिक ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकात त्यांचे ८ अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. कार्यक्रमाची पूर्वसिद्धता
१ अ. वेळ आणि मनुष्यबळ यांची न्यूनता असतांनाही कार्यक्रमाची पूर्वसिद्धता गुरुदेवांच्या कृपेने अल्प कालावधीत पूर्ण होणे : ‘तनिष्क’ या आस्थापनासाठी कार्यक्रम करायचे ठरल्यावर कार्यक्रमाच्या पूर्वसिद्धतेला आम्हाला एकच दिवसाचा कालावधी मिळाला. त्यात अन्य सर्व दैनंदिन सेवा सांभाळून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ‘विविध सात्त्विक आणि असात्त्विक अलंकार गोळा करणे, त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाने सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी करून ‘त्यांतील कुठले अलंकार प्रात्यक्षिक दाखवतांना वापरू शकतो ?’, हे निश्चित करणे, ‘तनिष्क’कडून त्यांच्याकडील अलंकारांची छायाचित्रे मिळवणे, त्यांच्या रंगीत छायाप्रती (प्रिंट आऊट) काढून आणणे’, आदी पुष्कळ सिद्धता करायची होती. त्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ यांची न्यूनता होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनन्यभावे शरण गेल्यावर त्यांच्या कृपेने ही पूर्वसिद्धता वेळेत पूर्ण झाली.
१ आ. ऐन वेळी ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे कार्यक्रम करण्याचे ठरल्यावरही त्याच्या सादरीकरणाची पूर्वसिद्धता आणि संहिता गुरुकृपेने अल्पावधीत पूर्ण होणे : प्रथम आम्ही हा कार्यक्रम भ्रमणभाषवरून करणार होतो. कार्यक्रमाचे स्वरूप अधिक व्यापक बनल्याने ‘तनिष्क’च्या अधिकार्यांच्या विनंतीनुसार ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे कार्यक्रम दाखवायचे ठरले. त्यामुळे त्या ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे प्रात्यक्षिक नेमके कसे दाखवायचे ?’, याचीही पूर्वसिद्धता करायची होती, तसेच कार्यक्रमाची संहिता सिद्ध करून ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे कार्यक्रम करायचे’, असे ऐन वेळी ठरले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन त्यांच्यावर सर्व सोपवल्यावर हे सर्वही अल्पावधीत पूर्ण झाले; परंतु हे ऐन कार्यक्रमाच्या आधी पूर्ण झाल्याने मला एकदाही पूर्ण संहितेचे वाचन आणि सराव करता आला नाही.
२. सात्त्विक अलंकारांमध्येही नकारात्मक ऊर्जा आढळण्यामागील सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लक्षात आलेले कारण आणि त्यांनी केलेले नामजपादी उपाय
कार्यक्रमाच्या सिद्धतेच्या अनुषंगाने ‘नेमके कुठले अलंकार प्रात्यक्षिकात वापरायचे ?’, हे ठरवण्यासाठी उपलब्ध अलंकारांच्या ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाने सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी केल्या. त्या वेळी ‘अत्यंत सात्त्विक नक्षी असलेल्या अनेक अलंकारांत पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असून त्यांत नाममात्र सकारात्मक ऊर्जा आहे’, असे आम्हाला आढळले. ‘सात्त्विक अलंकारांवर सूक्ष्मातून वाईट शक्तींची आक्रमणे होऊन त्यांवर त्रासदायक शक्तींचे आवरण आले आहे’, हे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लक्षात आले; म्हणून त्यांनी अलंकारांवर नामजपादी उपाय केले. नंतर अलंकारांतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे आढळले.
३. ‘सात्त्विक अलंकार ठेवायची खोकीही सात्त्विक असायला हवीत’, असे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लक्षात येणे
३ अ. अलंकार ठेवलेल्या खोक्यांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळणे : त्यानंतर काही घंट्यांनी अलंकारांत पुन्हा नकारात्मक ऊर्जा आढळली. तेव्हा अलंकार ठेवलेल्या खोक्यांचे सूक्ष्म परीक्षण करायचा विचार सद्गुरु गाडगीळकाकांच्या मनात आला. त्या खोक्यांचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर त्यांना ‘त्या खोक्यांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आहे’, असे आढळले; म्हणून त्या खोक्यांची ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाने चाचणी केल्यावर सद्गुरु काकांच्या परीक्षणाला दुजोरा मिळाला.
३ आ. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे सात्त्विक अलंकार खोक्यांमध्ये न ठेवता पितळ्याच्या ताटलीत ठेवल्यावर त्यांत पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळणे : ‘अलंकार ठेवायची खोकी असात्त्विक आहेत’, हे लक्षात आल्यावर सद्गुरु गाडगीळकाकांनी अलंकार खोक्यांमध्ये न ठेवता एका पितळ्याच्या ताटलीत ठेवायला सांगितले. (पितळ हा सात्त्विक धातू आहे.) हे सूत्र कार्यक्रम चालू होण्याच्या थोडा वेळ आधी लक्षात आले. त्यानुसार अलंकार खोक्यांमध्ये न ठेवता ताटलीत ठेवल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी सर्व सात्त्विक अलंकारांमध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळता पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले.
४. कार्यक्रम पाहून ‘तनिष्क’च्या अधिकार्यांनी दिलेले अभिप्राय !
४ अ. आम्ही सात्त्विक अलंकारांसह ते ठेवण्यासाठी सात्त्विक खोक्यांचीही निर्मिती करू ! : ‘कार्यक्रमात ‘तनिष्क’ आस्थापनाचा सकारात्मक ऊर्जा असलेला सात्त्विक हार त्या आस्थापनाच्या अलंकाराच्या खोक्यात ठेवला. तेव्हा अगदी अल्प कालावधीत त्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत होती. हे प्रात्यक्षिकात पाहिल्यावर ‘तनिष्क’चे अधिकारी आम्हाला म्हणाले, ‘‘आम्ही सात्त्विक अलंकारांसह सात्त्विक खोक्यांचीही निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करू.’’
४ आ. यापूर्वी आम्ही एवढा अचूक, सुंदर आणि अद्भुत माहिती सोप्या परिभाषेत सांगणारा कार्यक्रम कधीच पाहिला नव्हता ! : ‘तनिष्क’च्या अधिकार्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. श्री गुरूंच्या कृपेने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला त्या सर्व प्रश्नांची त्यांना समजतील, रुचतील आणि स्वीकारता येतील, अशी उत्तरे सुचवली आणि माझ्याकडून सहजतेने सांगून घेतली. कार्यक्रम संपल्यावर त्यांचे अधिकारी आम्हाला म्हणाले, ‘‘सर्वप्रथम तुम्ही ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे हा कार्यक्रम करण्याची सिद्धता दर्शवली’, याकरता पुष्कळ धन्यवाद ! तुम्ही आमच्या सर्व प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली, त्याने आम्ही अवाक् झालो आहोत. यापूर्वी आम्ही एवढा अचूक, कल्पक, सुंदर आणि अद्भुत माहिती सोप्या परिभाषेत सांगणारा कार्यक्रम कधीच पाहिला नव्हता. आम्ही पुष्कळ भारावून गेलो आहोत. कार्यक्रमाला हातभार लावणार्या सर्व साधकांना धन्यवाद देण्यासाठी आमचे शब्द अपुरे आहेत !’’
५. आलेल्या अनुभूती
५ अ. कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तत्त्व कार्यरत असल्याचे सर्व साधकांना जाणवणे : कार्यक्रमात काही सूत्रे ऐन वेळी आली, तरी मी श्री गुरूंच्या चरणी सर्व सोपवून निश्चिंत होते. ‘कार्यक्रमाच्या प्रत्येक सत्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तत्त्व कार्यरत आहे’, असे सेवेत सहभागी असणार्या आम्हा सर्व साधकांना जाणवत होते.
५ आ. गुरुदेवांच्या कृपेने कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडणे : ‘गुरुदेव प्रत्येक अडचण आणि अडथळा अलगद दूर करून सर्व सुरळीत करत आहेत’, याची आम्हाला सातत्याने अनुभूती येत होती. गुरुदेवांच्या कृपेने कार्यक्रमात कुठेही अडचण न येता सर्व कार्यक्रम सुरळीत आणि चांगला झाला.
६. शिकायला मिळालेले महत्त्वाचे सूत्र !
‘श्रीगुरुचरणांशी अनुसंधान प्रस्थापित करणे’, हीच कुठल्याही सेवेच्या यशाची गुरुकिल्ली असणे : ‘तनिष्क’ आस्थापनाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीगुरूंनी मला पुन्हा एकदा अनुभूती दिली, ‘श्रीगुरूंनी सर्व आधीच करून ठेवलेले असते. खरेतर त्यांच्या या ईश्वरी कार्यात आपल्याला त्यांचे माध्यम बनायची संधी देऊन त्यांनी आपल्यावर कृपा केलेली असते. ‘आपले क्रियमाण १०० टक्के वापरून श्रीगुरूंना संपूर्ण शरण जाऊन आणि शेष त्यांच्यावर सोपवून त्यांच्या चरणांशी अधिकाधिक अनुसंधान प्रस्थापित करणे’, हीच कुठल्याही सेवेच्या यशाची गुरुकिल्ली आहे !’
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘अलीकडच्या काळात विविध सेवांमध्ये श्रीगुरूंनी सातत्याने मला ही अनुभूती देऊन त्यांच्या सामर्थ्याची आंतरिक जाणीव करून दिली आहे आणि मला या साधनामार्गावर आश्वस्त केले आहे’, त्याकरता मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘माझ्यातील कर्तेपणा पूर्णतः नष्ट होऊन मला श्री गुरूंच्या चरणांशी एकरूप होण्याची अखंड अनुभूती यावी’, यासाठी त्यांनीच माझ्याकडून अविरत प्रयत्न करून घ्यावेत’, अशी त्यांच्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.८.२०२१)
|