महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या २ शोधनिबंधांना श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार !

  • शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !

  • ‘भयपट चित्रपटाचा (‘हॉरर मूव्ही’चा) सूक्ष्म परिणाम’ आणि ‘वारसा स्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ या विषयांवर (ऑनलाईन) शोधनिबंध सादर !

मुंबई – श्रीलंकेच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ने १५ ऑक्टोबर या दिवशी तेथे २ वेगवेगळ्या विषयांवर परिषदांचे आयोजन केले होते. ८ वी ‘आंतरराष्ट्रीय सामाजिक विज्ञान परिषद’ या पहिल्या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘भयपट चित्रपटाचा (‘हॉरर मूव्ही’चा) सूक्ष्म परिणाम’ या शोधनिबंधाला ‘सर्वाेत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. या परिषदेत २० देशांतून शोधनिबंध सादर करण्यात आले होते. त्यात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाला ‘सर्वाेत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ पुरस्कार प्राप्त झाला. द्वितीय ‘आंतरराष्ट्रीय पुरातत्व इतिहास आणि वारसा परिषद’ या दुसर्‍या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘वारसा स्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधनिबंध सादर केला. या परिषदेत १५ देशांतून २५ शोधनिबंध सादर करण्यात आले. त्यामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाला ‘सर्वाेत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार प्राप्त झाला.

हे दोन्ही शोधनिबंध महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी रामनाथी (गोवा) येथून ‘ऑनलाईन’ सादर केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे या दोन्ही शोधनिबंधांचे लेखक आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत १५ राष्ट्रीय आणि ६४ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध प्रस्तुत करण्यात आले आहेत. ७ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘सर्वाेत्कृष्ट पुरस्कार’ मिळाले आहेत.