माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण
नाशिक – पसार असणारे मुंबई येथील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनमिया यांनी अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज दिला आहे. त्यावरील न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुनमिया यांना पोलीस कोठडी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत कोठडी देण्याची विनंती केली होती. पुनमिया सध्या दुसर्या एका प्रकरणात मुंबई येथील पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कोठडी संपताच त्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कह्यात देण्याची सिद्धता चालू आहे. यामुळे पुनमिया यांनी जामिनासाठी येथील न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला. यावर २१ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुनमिया यांच्याविरुद्ध हा १२ वा गुन्हा नोंद आहे. यापूर्वी त्यांच्या विरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत खंडणी वसुलीसाठी धमकावणे, खंडणी गोळा करणे आणि फसवणूक करणे, असे विविध गुन्हे नोंद आहेत.
काय आहे प्रकरण ?ठाणे येथील पुनमिया यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्ता, तसेच कोट्यवधी रुपयांची भूमी खरेदी केली आहे. ही भूमी त्यांनी स्वतःच्या मुलाच्या नावावरही खरेदी केली आहे. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हे सर्व काम बिनबोभाट पार पडले; कारण यासाठी पुनमिया यांना परमबीर सिंह यांचे साहाय्य मिळाले. पुनमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंह यांनीच ही भूमी खरेदी केल्याची चर्चा चालू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही प्रविष्ट झाली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. |