‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या श्री दुर्गादेवीचा अवमान !
|
पणजी, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – बंगालच्या देवी दुर्गेला गोव्यात प्रत्यक्ष आणावे लागणार आहे. गोव्यात जी दुर्गा आहे तिला आम्ही ‘श्री शांतादुर्गा’ असे संबोधतो. ही श्री शांतादुर्गा शांत असते; मात्र खरी श्री दुर्गा ही बंगालमध्ये कोलकाता येथे आहे. गोव्यातील भस्मासुरासारख्या सरकारला घरी पाठवण्यासाठी बंगालमधील श्री दुर्गेला गोव्यात आणावे लागणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. गोव्यात पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केला आहे. गोव्यातील भाजप शासनाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’, तृणमूल काँग्रेस आदी विरोधी पक्ष प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार किरण कांदोळकर यांनी हे विधान केले.