शारदीय ऋतूचर्या – शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय !

वैद्य मेघराज पराडकर

१. विकारांची संख्या अधिक असलेला शरद ऋतू

‘पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो. पावसाळ्यामध्ये शरिराने सततच्या थंड वातावरणाशी जुळवून घेतलेले असते. शरद ऋतूचा आरंभ झाल्यावर एकाएकी उष्णता वाढल्याने नैसर्गिकपणे पित्तदोष वाढतो आणि डोळे येणे, गळू होणे, मुळव्याधीचा त्रास बळावणे, ताप येणे यांसारख्या विकारांची शृंखलाच निर्माण होते. शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो, म्हणूनच ‘वैद्यानां शारदी माता ।’ म्हणजे ‘(रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे’, असे गमतीत म्हटले जाते.

२. ऋतूनुसार आहार

२ अ. शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?

२ आ. आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे

२ आ १. भूक लागल्यावरच जेवा ! : पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. शरद ऋतूमध्ये ती हळूहळू वाढू लागते. यासाठी भूक लागल्यावरच जेवावे. नियमितपणे भूक नसतांना जेवल्यास पचनशक्ती बिघडते आणि पित्ताचे त्रास होतात.

२ आ २. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा ! : ‘असे चावून चावून जेवल्यास फार वेळ लागेल, वेळ वाया जाईल’, असे काही जणांना वाटू शकते; परंतु अशा रितीने जेवल्यास फार थोडे जेवले, तरी समाधान होते आणि अन्नपचन नीट होते. प्रत्येक घास ३२ वेळा चावल्याने त्यामध्ये लाळ चांगल्या प्रकारे मिसळली जाते. असे लाळमिश्रित अन्न पोटात गेल्याने ‘अमुक पदार्थाने पित्त होते’, ‘अमुक पदार्थ मला पचत नाही’, असे म्हणण्याची वेळ कधीही येत नाही; कारण लाळ ही आम्लाच्या विरोधी गुणांची आहे. ती भरपूर प्रमाणात पोटात गेल्यावर अती प्रमाणात वाढलेल्या पित्ताचे शमन होते. स्वामी रामसुखदासजी महाराज यांनी त्यांच्या एका प्रवचनामध्ये ‘प्रत्येक घास ३२ वेळा चावून झाला’, हे कसे ओळखावे, यासंबंधी सुंदर मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक घास चावतांना ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ या नामजपातील प्रत्येक शब्द २ वेळा म्हणावा. प्रत्येक शब्दाला एकदा या गतीने चावावे. या जपामध्ये १६ शब्द आहेत. त्यामुळे एका घासाला २ वेळा जप केल्याने ३२ वेळा चावून होते आणि भगवंताचे स्मरणही होते.

३. शरद ऋतूतील इतर आचार

३ अ. अंघोळीपूर्वी नियमित तेल लावणे : या ऋतूत अंघोळीपूर्वी नियमितपणे अंगाला खोबरेल तेल लावल्यास त्वचेवर पुटकुळ्या उठत नाहीत. ‘अती घाम येणे’ या उष्णतेमुळे होणार्‍या विकारामध्येही सर्वांगाला खोबरेल तेल लावणे लाभदायक आहे.

३ आ. सुगंधी फुले समवेत बाळगणे : सुगंधी फुले पित्तशमनाचे कार्य करतात. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी पारिजात, चाफा, सोनटक्का, अशी फुले समवेत बाळगावीत.

३ इ. कपडे : सुती, सैलसर आणि उजळ रंगाचे असावेत.

३ ई. झोप : रात्री जागरण केल्याने पित्त वाढते, यासाठी या ऋतूत जागरण करणे टाळावे. पहाटे लवकर उठावे. या दिवसांत घराच्या आगाशीत अथवा अंगणात उघड्या चांदण्यात झोपल्याने शांत झोप लागते आणि सर्व शीणही नाहीसा होतो. या ऋतूत दिवसा झोपणे वर्ज्य आहे.

४. सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार

४ अ. शोधन किंवा पंचकर्म : विशिष्ट ऋतूंमध्ये शरिरात वाढणारे दोष शरिरातून बाहेर काढून टाकणे याला ‘शोधन’ किंवा ‘पंचकर्म’ असे म्हणतात.

४ अ १ विरेचन : या ऋतूच्या आरंभी विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध घ्यावे, म्हणजे शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होते. यासाठी सलग ८ दिवस रात्री झोपतांना १ चमचा एरंडेल तेल किंवा तेवढेच ‘गंधर्व हरीतकी चूर्ण’ गरम पाण्यातून घ्यावे.

४ अ २. रक्तमोक्षण : शरीरस्वास्थ्यासाठी शिरेतून रक्त काढणे, याला आयुर्वेदात ‘रक्तमोक्षण’ असे म्हणतात. स्वास्थरक्षणासाठी प्रत्येक शरद ऋतूमध्ये एकदा रक्तमोक्षण करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. रक्तमोक्षणामुळे तोंडवळ्यावर पुटकुळ्या येणे, नाकातून रक्त येणे, डोळे येणे, गळवे होणे यांसारख्या विकारांना प्रतिबंध होतो. रक्तदान करणे हेही एकप्रकारे रक्तमोक्षणच होते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी या ऋतूच्या आरंभीच्या १५ दिवसांमध्ये एकदाच रक्तपेढीत रक्तदान करावे. रक्तदान तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच होत असल्याने यामध्ये काळजीचे कारण नसते.

४ आ. घरगुती औषधे : या दिवसांत होणार्‍या उष्णतेच्या सर्व विकारांवर चंदन, वाळा, अडूळसा, गुळवेल, किराइत, कडूनिंब, खोबरेल तेल, तूप यांसारखी घरगुती औषधे फारच लाभदायक आहेत. यांचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो –

१. चंदन सहाणेवर उगाळून सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा गंध वाटीभर पाण्यातून घ्यावे किंवा उगाळलेले गंध त्वचेवर बाहेरून लावावे. (४ ते ७ दिवस)

२. वाळ्याची मुळे पाण्यात ठेवून ते पाणी प्यावे.

३. अडूळसा, गुळवेल किंवा किराइत यांचा काढा करून १-१ कप दिवसातून ३ वेळा घ्यावा. (४ ते ७ दिवस)

४. कडुनिंबाच्या पानांचा वाटीभर रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. (४ ते ७ दिवस)

५. खडीसाखरेवर खोबरेल तेल किंवा तूप घालून ती चाटावी.

टीप : ४ ते ७ दिवस घेण्याची औषधे त्यापेक्षा अधिक दिवस सतत घेऊ नयेत.

५. हे कटाक्षाने टाळा !

या ऋतूत भर उन्हात फिरणे, पाण्याचे तुषार अंगावर घेणे, दवात भिजणे, सतत पंख्याचा जोराचा वारा अंगावर घेणे, रागावणे, चिडचिड करणे या गोष्टी या ऋतूत कटाक्षाने टाळाव्यात. या गोष्टींमुळे शरिरातील वातादी दोषांचे संतुलन बिघडते आणि विकार निर्माण होतात.

‘या शारदीय ऋतूचर्येचे पालन करून साधक निरोगी होवोत आणि सर्वांचीच आयुर्वेदावरील श्रद्धा वाढो’, ही भगवान धन्वन्तरीच्या चरणी प्रार्थना !’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)