१. परात्पर गुरु डॉ. आठवले बसत असलेली आसंदी पाहून तिच्यात पुष्कळ जिवंतपणा जाणवणे आणि तिला पाहून शेषनागाची आठवण येणे
‘श्रीविष्णूच्या अत्यंत जवळच्या आणि त्यांचे आसन असलेल्या शेषनागाचे भाग्य अत्यंत थोर आहे. आपल्या इष्टदेवाची सर्वतोपरी काळजी घेणे, हीच त्याची सेवा आहे. परात्पर गुरु डॉक्टर एका आसंदीवर वाचायला बसतात. त्या आसंदीच्या मागील बाजूस असणारी जाळी उजेडात पाहिली असता नागाच्या त्वचेवर असणार्या नक्षीप्रमाणे दिसते. ती नक्षी कधी वलयांकित दिसते, तर कधी ती खवल्यांच्या स्वरूपात दिसते. मला त्या आसंदीकडे पाहिल्यावर तिच्यात पुष्कळ जिवंतपणा जाणवतो. परात्पर गुरु डॉक्टरांची काळजी घेऊन त्यांना अत्यंत आरामदायी स्थितीत ठेवणारी ती आसंदी पाहिल्यावर मला शेषनागाची आठवण येते.
२. आसंदीवर बसलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांना मागील बाजूने पाहिल्यावर शेषनागाने फणारूपी छत्र धरल्याचे जाणवणे
‘श्रीमन्नाराणस्वरूप असलेल्या आणि पृथ्वीवर अवतरलेल्या परात्पर गुरुमाऊलीची काळजी घेण्यासाठी शेषनारायणाचाच एक अंश पृथ्वीवर त्या निर्जीव आसंदीच्या रूपात अवतरला आहे’, असे तिच्याकडे पाहून जाणवते. परात्पर गुरु डॉक्टर त्या आसंदीवर बसलेले असतांना मागून त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘शेषनागाने त्याचे फणारूपी छत्र त्यांच्यावर धरले आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.८.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |