मुलाला अमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकरणी अटक करण्यात आल्यावर अभिनेते जॅकी चॅन याने मागितली होती क्षमा !

अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अमली पदार्थांच्या प्रकरणाची माध्यमांनी केली तुलना

कुठे मुलाच्या कृत्याविषयी क्षमा मागणारे विदेशी अभिनेते जॅकी चॅन, तर कुठे भारतातील अभिनेते ! – संपादक

नवी देहली – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थार्ंच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याविषयी शाहरुख खान यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी गमतीमध्ये एका मुलाखतीत म्हटले होते, ‘माझ्या मुलाने अमली पदार्थांचे सेवन करावे, मद्य प्यावे, बलात्कार करावा.’ आता प्रत्यक्षात अमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मुलावर झाल्यावर शाहरुख खान मौन आहेत. अशा वेळी हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि निर्माते जॅकी चॅन यांच्याविषयीची माहिती माध्यमांतून प्रसिद्ध होत आहे. वर्ष २०१४ मध्ये जॅकी चॅन यांचा मुलगा जायसी चॅन याला चीनच्या पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या प्रकरणी अटक केली होती. यावरून जॅकी चॅन यांनी जनतेची क्षमा मागितली होती.

१. जायसी चॅन याच्याकडे जवळपास १०० ग्रॅम गांजा आढळला होता. त्यावेळी तो ३२ वर्षांचा होता. जायसी चॅनच्या घरी अनेक कलाकार अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी येत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी त्याला ६ मासांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती.

२. वर्ष २००९ मध्ये चिनी पोलिसांनी जॅकी चॅन यांना ‘नार्कोटिक कंट्रोल अँबेसॅडर’ (अमली पदार्थ नियंत्रण राजदूत) म्हणून घोषित केले होते. अशातच मुलाचे नाव अमली पदार्थांच्या सेवन केल्याच्या प्रकरणी समोर येताच जॅकी चॅन यांनी क्षमा मागितली होती. ‘मला लाज वाटत आहे. मी माझ्या मुलाच्या कृत्यामुळे अप्रसन्न झालो आहे. मला आशा आहे की, जायसीसमवेत जे घडले, ते पाहून तरुण मुलांना धडा मिळेल. मी माझ्या मुलाचे योग्य संगोपन करू शकलो नाही. मी आणि जायसी सर्वांची क्षमा मागतो,’ या आशयाची पोस्ट जॅकी चॅन यांनी केली होती. नंतर जॅकी चॅन यांनी मुलाला संपत्तीमध्ये वाटाही नाकारला होता.