लडाखमधून सैन्य माघारी घेण्याच्या भारताच्या मागणीला चीनचा नकार !

भारताच्या मागण्या अवास्तव असल्याची चीनची भूमिका

भारताच्या भूमीत घुसखोरी करायची आणि वर भारतालाच सुनवायचे, या चिनी उद्दामपणाला भारताने जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

नवी देहली – भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये लडाखमधील आपापले सैन्य माघार घेण्याविषयी १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये चीनने सैन्य माघार घेण्याचा प्रस्ताव नाकारला. चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने याविषयी चीन सैन्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताने अवास्तव मागण्यांवर जोर दिला होता.

भारतीय सैन्याच्या निवेदनात म्हटले आहे की, बैठकीमध्ये भारताच्या उर्वरित क्षेत्रांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या; पण चीनने यावर सहमती दर्शवली नाही. तसेच चीन कोणताही दूरगामी प्रस्तावदेखील देऊ शकला नाही. त्यामुळे बैठकीत उर्वरित भागांवर योग्य चर्चा होऊ शकली नाही. दोन्ही बाजूंनी संवाद आणि भूमीवर स्थिरता राखण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, चीन द्विपक्षीय संबंधांचा एकंदर दृष्टीकोन विचारात घेईल आणि द्विपक्षीय करार अन् शिष्टाचार यांचे पूर्ण पालन करून उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्याच्या दिशेने काम करेल, अशी आमची अपेक्षा आहे. (चीनकडून अशी अपेक्षा करणे हास्यास्पदच होय ! – संपादक)