आसाममधील बहुतांश मुसलमान धर्मांतरित आहेत ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

धर्मांतराचा धोका ओळखून केंद्र सरकार आता तरी धर्मांतरविरोधी कायदा लागू करणार का ? – संपादक

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा इंडिया टुडे’च्या चर्चासत्रात बोलताना

नवी देहली – राज्यातील बहुतांश मुसलमान धर्मांतरित आहेत. त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि ते गोमांस खात नव्हते, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी  ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’ मध्ये केले.

‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीच्या वतीने एका चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या वेळी  आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या अवैध अतिक्रमणविरोधी मोहिमेविषयी बोलतांना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की,

१. बांगलादेशी मुसलमानांनी येथे घुसखोरी करून अतिक्रमण केले, हे बहुतांश लोकांना ठाऊक आहे. मी आसामच्या मुसलमानांना नेहमीच आठवण करून देतो की, तुमचे पूर्वज गोमांस खात नव्हते. त्यामुळे त्याला किमान तुम्ही तरी प्रोत्साहन देऊ नका.

२. या देशात परंपरेची गोष्ट केल्यावर अनेक लोक अप्रसन्न होतात. आमच्या संस्कृतीच्या मूल्यांतून अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र दृष्टीने पाहू नये.

३. धार्मिक स्थळांच्या ५ किलोमीटरच्या परिसरात गोमांस प्रतिबंध केल्यामुळे मुसलमानांना आनंद झाला आहे आणि त्यामुळे आपापसांतील सौहार्द वाढला आहे. गोमांस खाण्याविषयी करण्यात आलेल्या नवीन नियमांना मुसलमान संघटनांचा नाही, तर साम्यवादी संघटनांचा विरोध आहे.

४. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (‘एन्.आर्.सी’) कायदा लागू केला आहे आणि त्यामुळे कोणताही धार्मिक तणाव निर्माण होणार नाही. धार्मिक तणाव न्यून होण्यासाठीच हा कायदा केला आहे.