कुडाळ – वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील नव्या ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे ९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे; उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे; पालकमंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याने जिल्हावासियांना याचा आनंद घेता यावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सकाळी ११ वाजता मोठी ‘स्क्रीन’ (मोठा पडदा) लावून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.