अरुणाचल प्रदेशच्या सीमेत चीनच्या २०० सैनिकांची घुसखोरी !

  • भारताने चिनी सैनिकांना कह्यात घेतले !

  • दोन्ही सैन्यांच्या चर्चेनंतर चिनी सैनिकांची सुटका

चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले की, तो शेपूट घालतो, हे लक्षात घेता भारताने कायम याच भूमिकेत राहिले पाहिजे ! – संपादक

नवी देहली – गेल्या आठवड्यात चिनी सैन्याच्या गस्त घालणार्‍या पथकाने अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात घुसखोरी केल्याची आणि त्यांना भारतीय सैनिकांनी कह्यात घेतल्याची घटना नुकतीच समोर आली. या भागात २०० चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर त्यांनी तेथील भारतीय सैनिकांच्या रिकाम्या ‘बंकर्स’ची नासधूस केली. त्यावर भारतानेही चोख प्रत्युत्तर देत काही चिनी सैनिकांना कह्यात घेतले. हे प्रकरण नंतर स्थानिक सैन्याधिकार्‍यांच्या स्तरावर सोडवण्यात आले. त्यानंतर चिनी सैनिकांना सोडून देण्यात आले. या घटनाक्रमाच्या संदर्भात भारतीय सैन्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

१. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार भारत आणि चीन सीमेवर औपचारिकरित्या सीमा निश्चित करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांची सीमारेषा वैयक्तिक आकलनावर आधारित आहे आणि दोन्ही देशांच्या आकलनात भेद आहे. त्यामुळे या भागात वारंवार अशा घटना घडू शकतात. दोन्ही देश आपापल्या धोरणेनुसार सीमेवर टेहळणी करतात. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद झाले, तर राजशिष्टाचारानुसार त्यावर शांततेच्या मार्गाने चर्चेद्वारे तोडगा काढला जातो. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असली, तरी सीमेवर शांती कायम आहे. (धूर्त चीनने पाकिस्तानकरवी आधीच काश्मीरच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे, तसेच अरुणाचल प्रदेशवरही स्वत:चा हक्क असल्याची गरळओक चीनचे राज्यकर्ते, सैन्याधिकारी आणि वर्तमानपत्रे वरचेवर करत असतात. या पार्श्वभूमीवर भारताने आधीच सतर्क होऊन सीमारेषा निश्चित करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून केले न जाणे भारताला लज्जास्पद ! – संपादक)

२. दोन्ही बाजूच्या गस्त घालणार्‍या तुकड्या जेव्हा प्रत्यक्षात भेटतात, तेव्हा ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे त्या वागतात. या प्रदेशामध्ये चीनने अशाप्रकारे घुसखोरी करणे काही नवीन राहिलेले नाही. वर्ष २०१६ मध्ये २०० हून अधिक चिनी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसले होते; मात्र काही घंट्यांनंतर ते परत त्यांच्या प्रदेशात गेले. वर्ष २०११ मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये असणारी २५० मीटर उंच भिंत चढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही भारताने आक्षेप नोंदवला होता.

३. यापूर्वी ३० सप्टेंबर या दिवशी उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चीनच्या जवळपास १०० सैनिकांनी सीमारेषा पार करून भारतीय क्षेत्रात ५ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. माघारी जातांना त्यांनी येथील एक पूलही उद्ध्वस्त केला होता, अशी माहिती समोर आली होती; परंतु सैन्याने अशी घटना झाल्याचे वृत्त फेटाळले होते.