कळंगुट येथील २ गटांतील भांडण, हे टोळीयुद्ध नसल्याचा पोलिसांचा दावा
अशी टोळीयुद्धे शांत आणि सुरक्षित समजल्या जाणार्या गोव्यात अपेक्षित नाहीत. पर्यटकांच्या दृष्टीनेही असे प्रकार चिंताजनकच ठरतील !- संपादक
पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – कळंगुट येथे ५ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धात तलवारीने केलेल्या आक्रमणात एक जण गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार टारझन पार्सेकर (रहाणारा नागोवा) याला कळंगुट येथून, तर इम्रान बेपारी, सूर्यकांत कांबळी आणि सुरज शेट्ये यांना गोव्यातून पलायन करत असतांना महाराष्ट्र सीमेलगत पेडणे येथून कह्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयित तथा कुख्यात गुन्हेगार टारझन याच्याकडून आक्रमणासाठी वापरण्यात आलेली तलवार कह्यात घेतली आहे.
५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री एका ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे स्वप्नील रेडकर यांनी ‘एका व्यक्तीच्या डोळ्यांत मिरचीचा स्प्रे टाकून त्याच्यावर चौघांनी आक्रमण केले’, अशी पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित व्यक्तीवर संशयित टारझन रेडकर याने तलवारीने, तर संशयित सूर्यकांत कांबळी याने लोखंडी सळीने आक्रमण केले. दोन टोळ्यांमध्ये जुने वैमनस्य असल्याने आणि सूड घेण्यासाठी हे आक्रमण झाल्याचे कळंगुट पोलिसांनी सांगितले.
कळंगुट येथील आक्रमण हे टोळीयुद्ध नव्हे ! – शोबित सक्सेना, पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा
कळंगुट येथे ‘टीटो’ या आस्थापनाजवळ ५ ऑक्टोबरच्या रात्री झालेले भांडण हे टोळीयुद्ध नव्हते, तर दोन गटांमधील भांडण होते, असा दावा उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी केला. ते म्हणाले, ‘‘कळंगुट येथील घटनेला टोळीयुद्ध म्हणणे चुकीचे ठरेल. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्ती एकत्र आल्याने त्यांच्यामध्ये भांडण झाले. गोवा पोलीस या प्रकरणी सखोल अन्वेषण करत आहेत आणि त्यानंतरच यामागील सत्य समोर येणार आहे.’’
टोळीयुद्धातील संशयित इम्रान बेपारी हा कुख्यात गुन्हेगार
टोळीयुद्धातील संशयित इम्रान बेपारी हा कुख्यात गुन्हेगार आहे आणि एका गुन्ह्यातून त्याची नुकतीच जामिनावर सुटका झाली होती. पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना पुढे म्हणाले, ‘‘वारंवार गुन्हे करणार्यांच्या विरोधात कायद्यात कठोर तरतुदी आहेत आणि कुख्यात गुन्हेगार इम्रान बेपारी याच्या विरोधात या कठोर तरतुदी लागू करण्यात येणार आहेत.’’ (कुख्यात गुन्हेगार जामिनावर कसा काय सुटतो ? त्याला पहिल्याच गुन्ह्यात कारागृहात पाठवण्यास पोलीस कुठे अल्प पडतात, ते पहायला हवे ! कायद्यात कठोर तरतुदी असल्या, तरी तसे पुरावे पोलीस गोळा करतात का ? – संपादक)
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
गोव्यात वारंवार होणारी टोळीयुद्धे आणि वाढती गुन्हेगारी यांमुळे एरव्ही शांत अन् सुरक्षित असलेल्या गोमंतकाची प्रतिमा मलीन होत आहे. भाजप शासन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. शिवसेनेने राज्यापालांची भेट घेऊन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची माहिती त्यांना दिली.