प्रयागराज येथील हुतात्मा चंद्रशेखर आझाद पार्कमधील सर्व अतिक्रमणे हटवा ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

मजार आणि मशीद हेही हटवण्यात येणार

  • पार्कमध्ये अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशी अतिक्रमणे हटवण्याची मागणी करण्यासाठी न्यायालयापर्यंत का जावे लागते ? प्रशासन ते का करत नाही ? प्रशासनातील अशा कामचुकार आणि निष्क्रीय संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
  • पार्ककध्ये मुसलमानांची अतिक्रमणे होती म्हणून प्रशासनाने शेपूट घातले होते  का ? येथे वैध मंदिर जरी असते, तरी प्रशासनाने लगेच पाडले असते, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
प्रयागराजमधील हुतात्मा चंद्रशेखर आझाद पार्क

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराजमधील हुतात्मा चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये असणारी सर्व अतिक्रमणे हटवण्याचा आदेश दिला आहे. यांत एक मशीद आणि मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) यांचाही समावेश आहे. ‘वर्ष १९७५ नंतर पार्कमध्ये झालेली सर्व बांधकामे अवैध असून ती पाडण्यात आली पाहिजेत. या आदेशाच्या कार्यवाहीचा अहवाल ८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाला सादर करावा. आम्हाला वाटते की, पार्क अतिक्रमण मुक्त असले पाहिजे’, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
जितेंद्र सिंह यांनी याविषयी याचिका प्रविष्ट केली होती. येथे कृत्रिम कबरी बनवून ही जागा हडपण्याचा डाव होता, असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला होता. ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी सिंह यांच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला होता. या पार्कमध्ये जिमखाना क्लबही आहे. याचे दायित्व क्रीडा विभागाकडे आहे. तोही हटवण्यात येणार आहे.