‘फी’साठी तगादा लावणार्यांवर कारवाई करणार ! – भास्करराव बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी
सोलापूर – राज्यशासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ९८० शाळा चालू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. शहर आणि जिल्ह्यातील खासगी शाळांनी विद्यार्थी किंवा पालक यांना ‘फी’साठी तगादा लावून त्रास दिला किंवा त्यांचे शिक्षण थांबवल्यास मोठी कारवाई करणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.
१. करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत आजही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या गावात शाळा बंद आहेत. सोलापूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत सरकारी आणि खासगी सर्व शाळा चालू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व वर्ग चालू करण्यात आले आहेत.
२. विद्यार्थी शाळेत किंवा वर्गात प्रवेश करतांना त्याने मुखपट्टी परिधान केली आहे ना हे पहाणे अनिवार्य केले आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे मुखपट्टी नसल्यास शालेय प्रशासनाने त्याला ती मुखपट्टी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेच्या शिक्षकांकडे विद्यार्थ्याचे तापमान तपासणी करण्याचे यंत्र देण्यात आले आहे.
३. दळणवळण बंदीमुळे अनेक पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे, त्यामुळे ‘फी’साठी खासगी संस्था चालकांनी टप्प्याटप्प्याने ‘फी’ घ्यावी, एकाच वेळी संपूर्ण ‘फी’ भरा, असा तगादा लावू नये, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली. ‘फी’साठी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबवले जाणार नाही, याचे दायित्व देण्यात आले आहे.