पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथील संतपिठात ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश चालू; वयाची अट नाही !

अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी ६ मास असणार !

पैठण येथील संतपिठ

संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पैठण येथील संतपिठात एकूण ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश चालू आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २० आहे. यंदा संतपिठात अधिकाधिक १०० जणांना संत परंपरेचे धडे दिले जाऊ शकतात. ६ मासांसाठी अभ्यासक्रमाचा दाखला मिळवण्यासाठी प्रत्येकी १ सहस्र रुपये शुल्क आहे.

१. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते की, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर आणि आळंदी यांसह राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांतील संत-महंत अध्यापन करतील. असे असले, तरी संतपिठाचे समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते यांनी अध्यापन कोण करणार ?, याविषयी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. ‘अध्यापनासाठी संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय यांवर अभ्यास असणार्‍यांना निमंत्रित केले जाईल’, असे सूतोवाच डॉ. वक्ते यांनी केले आहे.

२. संतपीठ सध्या विनाअनुदानित असल्यामुळे नियमित अध्यापकांची नियुक्ती करण्याचा विद्यापिठाचा मानस नाही. त्यामुळे २५ ऑक्टोबरपासून तात्पुरत्या स्वरूपात वर्ग चालू होतील.

३. अध्यापनानंतर ५ अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ४०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये ३२० गुणांची लेखी, तर ८० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत.

संतपिठाच्या ५ अभ्यासक्रमांमध्ये नेमके काय शिकवले जाणार आहे, त्याचा थोडक्यात आढावा

१. तुकाराम गाथा ग्रंथ परिचय

१२ श्रेयांक असलेल्या या अभ्यासक्रमात १२ तज्ञांची व्याख्याने होतील. काही भाग स्वयं अध्ययन करावे लागेल. अभंग, तत्त्वज्ञान, आधारग्रंथ, अभंगव्रत, भाषा, प्रभाव, प्रमाणित अभंग, कालसंवादी, रचनात्मकता, साहित्य विश्लेषण, निरूपमात्मकता, सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्थिती, सामाजिक प्रभाव, फलश्रुती, दृष्टांत, प्रकट चिंतन आदी गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

२. श्री एकनाथी भागवत

यातही १२ व्याख्यानांसाठी १२ श्रेयांक रहाणार आहेत. संदर्भ साहित्य परिचय, चरित्र-व्यक्तित्व-कर्तृत्व, परंपरा आणि सामाजिक योगदान, संत परंपरा, संक्षिप्त इतिहास, प्रयोजन, भूमिका प्रमाण संदर्भ, ओवी वृत्त, भाषा, प्रभाव, भक्ती आणि वैराग्यशास्त्र संदर्भ, संवादी भाषा वर्तन, असे या अभ्यासक्रमातून शिकवले जाणार आहे.

३. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ परिचय

या अभ्यासक्रमात प्रारंभी श्रीमद्भगवद्गीतेचा ग्रंथ परिचय, त्याची पार्श्वभूमी, विस्तार, प्रयोजन आणि गीतेचे महत्त्व सांगितले जाईल. विश्वात्मक सौहार्दाची संहिता, अध्यायवार विषय, अध्याय सार आदींवर भर देण्यात येईल.

४. वारकरी संप्रदाय परिचय

या अभ्यासक्रमात उत्सव, दैनंदिन उपक्रम-परंपरा, वारी परंपरा स्वरूप आणि उद्दिष्ट्ये, वारकरी अंतरंग आणि बहिरंग लक्षणे, सामाजिक प्रभाव, साधना मार्ग, तीर्थक्षेत्रांचा परिचय, वारकरी तत्त्वज्ञान, फलश्रुती यांसंदर्भात १२ व्याख्याने होतील.

५. महानुभाव संप्रदाय परिचय

दीक्षा पद्धती आणि स्वरूप, अनुयायी अंतरंग आणि बहिरंग लक्षणे, तीर्थक्षेत्रांची ओळख, ग्रंथ संपदा अभ्यास, साधना मार्ग, उगम-इतिहास आणि कालनिश्चिती या गोष्टींचा अभ्यास या अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे.