आता केंद्रीय कर्मचार्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीलाच भरपाई मिळणार !
नवी देहली – केंद्र सरकारच्या कर्मचार्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास मिळणार्या एकमुश्त भरपाईच्या नियमामध्ये पालट करण्यात आला आहे. आता अशा कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याने नामनिर्देशित केलेल्या सदस्यालाच (‘नॉमिनी’लाच) मृत्यूत्तर लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या सेवेत असतांना कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सरकारकडून भरपाई देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये ‘नॉमिनी’ नेमण्याची आवश्यकता नव्हती, तसेच कर्मचार्याच्या मृत्यूनंतर त्याची भरपाई कुणाला द्यायची, हे स्पष्टही करण्यात आलेले नव्हते. आता नियम स्पष्ट करण्यात आले असून भरपाईची सर्व रक्कम कर्मचार्याने नामनिर्देशित केलेल्या सदस्याला देण्यात येईल. सरकारने जारी केलेल्या निवेदन पत्रकामध्ये असे सूचित करण्यात आले आहे की, या संदर्भात केवळ कुटुंबातील सदस्यालाच नामनिर्देशित करता येईल. जर कर्मचार्याने कुणालाही नामनिर्देशित केले नाही, तर भरपाईची रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांना सारख्या प्रमाणात वाटप केली जाईल.