मुंबई – कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी सतत अन्यायाची भूमिका घेत आहे. कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या न्यून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली. कर्नाटक सरकारने ‘बेळगावमध्ये केवळ १५ टक्के मराठी भाषिक आहेत’, असा निष्कर्ष काढला आहे, यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण अहवाल खोटा असून त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही ? राज्य सरकार गप्प का आहे ?, असा संतप्त प्रश्नही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना उपस्थित केला.
या वेळी संजय राऊत पुढे म्हणाले की, बेळगावमध्ये ६० ते ६५ टक्के मराठी बांधव आहेत. आजही ती संख्या तेवढीच आहे. कर्नाटक सरकारने केवळ राजकीय स्वार्थासाठी त्या संपूर्ण भागाचे कानडीकरण करून मराठी भाषिकांची टक्केवारी न्यून करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरीही सीमाभागातील बहुमत हे मराठी आहे. बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झालेला आहे; मात्र तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मते ही भाजपहून अधिक आहेत.