५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. गौरी गणेश कौरासे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गौरी गणेश कौरासे एक आहे !

आज भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी (२.१०.२०२१) या दिवशी चंद्रपूर येथील चि. गौरी गणेश कौरासे हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती आणि तिची आई अन् आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. गौरी कौरासे

चि. गौरी गणेश कौरासे हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भारपणात आलेल्या अनुभूती

१ अ. गरोदर असतांना वाईट स्वप्ने पडणे आणि पोटावर हात ठेवून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ अन् ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप केल्यावर साधिकेला स्वप्ने पडण्याचे प्रमाण न्यून होणे : ‘गरोदर असतांना मला वाईट स्वप्ने पडायची. ‘त्या स्वप्नांमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात जेवणाचे पदार्थ आणि काही नातेवाइकांचा मृत्यू झाला आहे’, असे मला दिसायचे. तेव्हा माझ्या आईने (चंद्रपूर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मंगला दर्वे यांनी) मला प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी रामरक्षा म्हणायला सांगितले. त्या समवेत मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ अन् कुलदेवता ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हे नामजप पोटावर हात ठेवून करत होते. त्यानंतर मला स्वप्ने पडण्याचे प्रमाण न्यून झाले.

१ आ. ‘श्री भवानी देव्यै नमः ।’ हा नामजप करत असतांना माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू व्हायचा. त्यानंतर माझा हाच नामजप चालू रहायचा.

१ इ. सहावा मास – साधिकेला स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे : मे २०२० मध्ये मला सहावा मास चालू असतांना एक स्वप्न पडले. स्वप्नात ‘एका सभागृहात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सेवा चालू असून तिथे सर्व साधक सेवा करत आहेत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले ती सर्व सेवा पहात आहेत’, असे मला दृश्य दिसले. या स्वप्नाच्या माध्यमातून मला प.पू. गुरुमाऊलींचे दर्शन झाले.

१ ई. सनातनच्या ग्रंथांचे वाचन करतांना गर्भाने प्रतिसाद देणे : गर्भारपणी मी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘बाळाची वाढ आणि विकास’, तसेच ‘आपले बाळ (जन्म ते १ वर्ष) या ग्रंथांचे वाचन करायचे. त्या वेळी ‘गर्भ आतून प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.

२. प्रसुती

सौ. शुभांगी कौरासे

बाळ पायाळू असल्याने नऊ मास पूर्ण झाल्यानंतर माझी नैसर्गिक प्रसुती न होता शस्त्रकर्म होऊन प्रसुती झाली आणि बाळ सुखरूप जन्माला आले.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ४ मास 

३ अ १. नामजपाची आवड : बालिका (गौरी) प्रतिदिन पहाटे साडेचार वाजता उठायची. पहाटे माझी आई प्रतिदिन भ्रमणभाषवर दुर्गादेवीचा नामजप लावून नामजप करायची. तेव्हा गौरीही नामजप ऐकत झोपी जायची. मी दत्तजयंतीच्या दिवशी गौरीला घेऊन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. तेव्हा गौरी पुष्कळ खळखळून हसत होती. मी नामजप करत असतांना तिला पुष्कळ आनंद व्हायचा.’  – सौ. शुभांगी कौरासे (चि. गौरीची आई), चंद्रपूर

३ अ २. हसतमुख आणि अनुकरणप्रिय : ‘गौरी सकाळी हसतच झोपेतून उठायची. मी तिला उचलून घेतांना प्रतिदिन तिच्याकडे पाहून ‘नमस्कार’ असे म्हणत हाताने नमस्काराची मुद्रा करायचे. काही दिवसांनी गौरीही दोन्ही हातांची बोटे एकमेकांत अडकवून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागली.

३ अ ३. सात्त्विक गाणी आणि भजने यांची आवड : गौरीला पाळण्यात झोपवतांना भ्रमणभाषवर श्रीकृष्ण किंवा श्रीराम यांचा पाळणा लावल्यावर ती शांत झोपायची. तिचे आजोबा (श्री. लक्ष्मण दर्वे, गौरीच्या आईचे वडील) तिला पाळण्यात झोपवतांना गीतरामायण म्हणायचे. ते ऐकत ती शांत झोपी जायची.

३ आ. ४ ते ८ मास  

सौ. मंगला दर्वे

३ आ १. आजी-आजोबांची ओळख न विसरणे : गौरी आमच्या घरातून तिच्या वडिलांच्या (श्री. गणेश कौरासे) घरी गेल्यावर एक मासाने आम्ही तिला भेटायला गेलो. त्या वेळी ती माझ्याकडे बघून हसली. तिचे आजोबा दिसल्यानंतर तिने लगेच आजोबांना नमस्कार केला. एक मासाचा कालावधी लोटूनही तिने आम्हाला ओळखले आणि नमस्कार करायलाही विसरली नाही.

३ आ २. गौरीला परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ नेल्यावर ती लगेच त्याकडे झेप घ्यायची आणि छायाचित्राला हात लावायची.’ – सौ. मंगला लक्ष्मण दर्वे (चि. गौरीची आजी (आईची आई), आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), चंद्रपूर

३ इ. ८ ते ११ मास

३ इ १. देवतांच्या चित्रांकडे पाहून हसणे : गौरीला ‘सनातन पंचांग’ पुष्कळ आवडते. ती कधी रडत असल्यास मी तिच्याजवळ पंचांग ठेवते. ती पंचांगात असलेल्या देवतांच्या चित्रांकडे पाहून त्यांना हात लावते आणि त्यांच्याकडे पाहून हसते.

३ इ २. गौरीला असलेले गोप्रेम ! : गौरीला गाय अधिक प्रिय आहे. एकदा गाय दारात आली असतांना गौरीच्या आजोबांनी तिला गायीजवळ नेले. तेव्हा गौरीने गायीला हात लावला. त्यानंतर गाय तिथेच बसल्यावर गौरीने गायीच्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा तिला पुष्कळ आनंद होत होता.

४. स्वभावदोष 

हट्टीपणा करणे.’

– सौ. शुभांगी गणेश कौरासे (चि. गौरीची आई), चंद्रपूर (लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक २३.९.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक