२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
१. विवाहाला १२ वर्षे होऊनही मूल-बाळ होत नसल्याचे आधुनिक वैद्यांना सांगणे
‘मी पडेल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आधुनिक वैद्य (डॉ.) रविकांत नारकर यांच्या चिकित्सालयात पत्नीच्या ‘थायरॉइड’च्या पडताळणीसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना मी त्यांना सांगितले, ‘‘आमच्या लग्नाला १२ वर्षे झाली, तरी आम्हाला अद्याप मूल-बाळ नाही.’’ त्यावर आधुनिक वैद्य नारकर यांनी विचारले, ‘‘तुम्ही त्यासाठी काय चाचण्या आणि उपचार केले ?’’ तेव्हा ‘‘आम्ही गेली १० वर्षे वेगवेगळ्या आधुनिक वैद्यांकडे उपचार आणि चाचण्या करतच आहोत. ३ वेळा पत्नी २-३ मासांची गरोदर असतांना तिचा गर्भपात झाला होता’’, असे सांगितले.
२. सनातन संस्थेने याचे कारण ‘पूर्वजांचा त्रास आहे’ असे सांगून त्यासाठी दत्ताचा नामजप करण्यास आधुनिक वैद्य नारकर यांनी सांगणे आणि समवेत सनातन संस्था प्रकाशित ‘दत्त’ हा लघुग्रंथ वाचण्यासाठी देणे
तेव्हा आधुनिक वैद्य नारकर म्हणाले, ‘‘अशी समस्या पूर्वजांच्या त्रासामुळे असू शकते आणि त्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिकाधिक केल्यास त्याचा लाभ होतो’, असे सनातन संस्थेच्या वतीने सांगितले जाते. समवेत कुलदेवतेचा नामजप आणि प्रार्थना केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. तुम्हीसुद्धा असे प्रयत्न करू शकता.’’ आम्ही परत जातांना त्यांनी एका कागदावर ‘कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप कसा करायचा ?’, ते लिहून दिले आणि आम्हाला वाचण्यासाठी ‘दत्त’ हा लघुग्रंथ दिला.
३. ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप विश्वासाने केल्यावर दुसर्याच मासात पत्नीला दिवस रहाणे आणि दत्ताच्या नामजपाची प्रचीती येणे
त्यानंतर आम्ही दोघांनी पूर्ण विश्वासाने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला. नामजप चालू केल्यानंतर दुसर्या मासातच पत्नीला दिवस गेले. त्यामुळे आमचा नामजपावरील विश्वास वाढला. आम्ही पूर्ण श्रद्धेने तो नामजप चालूच ठेवला. त्यानंतर दिवस पूर्ण भरले. बाळंतपणाच्या दिवशीही आम्ही ‘दत्त’ हा लघुग्रंथ समवेत ठेवला होता. आम्ही हा नामजपादी उपाय केल्यानंतर बाळ जन्माला आले. अजूनही आम्ही तो जप चालू ठेवला आहे. ‘सनातन संस्था समाजासाठी किती महान कार्य करत आहे ?’, याची आम्हाला जाणीव झाली. यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत.’
– श्री. नंदकुमार शिंदे, वाघोटण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (३१.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |