२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
१. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु, संत आणि दैवी बालके यांच्या वास्तव्यामुळे सनातनच्या आश्रमांना तीर्थक्षेत्रांचे स्वरूप प्राप्त झालेले असणे
‘सध्या पितृपक्ष चालू आहे. पितरांना गती मिळण्यासाठी पितृपक्षात सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधक आश्रमात श्राद्धविधी करतात. २२.९.२०२१ या दिवशी आमच्या कुटुंबाकडून पितरांचे श्राद्ध रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाले. त्या दिवशी मला आणि आईला असे जाणवले की, आश्रमाच्या तळमाळ्यावरील श्राद्धाच्या ठिकाणी गयेचे पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण झाले आहे. आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. ज्याप्रमाणे गयेला श्रीविष्णूच्या चरणांचा स्पर्श लाभलेला आहे, त्याप्रमाणे आश्रमाच्या तळमजल्यावर विष्णुस्वरूप असणारे गुरुदेव परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निळसर रंगाचे चरण आहेत आणि त्यांच्या चरणस्पर्शामुळे गयेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. तसेच परात्पर गुरुदेवांच्या अस्तित्वामुळे सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या तळमाळ्यावरील श्राद्धाच्या ठिकाणी गयेप्रमाणे तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु, संत आणि दैवी बालके यांच्या वास्तव्यामुळे सनातनच्या आश्रमांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या श्राद्धविधीचा परिणाम रात्री रामनाथी आश्रमातील आमची खोली अधिक प्रकाशमय झाली आणि खोली व्यापक दिसत होती. आमच्या पितरांना पुढची गती मिळाल्यामुळे आमच्या खोलीत पोकळी निर्माण झाली असून आम्हा दोघींना पुष्कळ हलकेपणा आणि आनंद जाणवत होता.
२. संत साधकांना करत असलेले मार्गदर्शन साधकांच्या पितरांनी ऐकणे
त्याचप्रमाणे ‘२७.९.२०२१ या दिवशी देवाच्या कृपेने आम्हा काही साधकांना एका संतांचा सत्संग आणि मार्गदर्शन लाभले. या सत्संगाच्या वेळी मला त्या संतांच्या पाठीमागे सूक्ष्मातून विविध देवदेवता आणि ऋषिमुनी यांचे अस्तित्व जाणवले. आश्रमात श्राद्धाच्या वेळी आलेल्या पितरांपैकी सात्त्विक पितरांना आश्रमाच्या वायुमंडलातून दूर जायचे नव्हते. त्यामुळे ते संतांचे दर्शन आणि मार्गदर्शन यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्यासाठी सत्संगात सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे जाणवले. काही पितरांना सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्याने मुक्ती मिळाली आणि काही जण त्या संतांचा सत्संग भावपूर्णरित्या ग्रहण करत असल्याचे जाणवले.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२१)
|