‘आयुष आपके द्वार’ मोहिमेअंतर्गत उगवे, पेडणे येथे औषधी वनस्पतींचे वाटप आणि लागवडीविषयी मार्गदर्शन

उपस्थित शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करतांना डावीकडून प्रा. डॉ. अविनाश आडे आणि प्रा. डॉ. दिगंबर मोकाट

पेडणे  – २९.९.२०२१ या दिवशी आयुष मंत्रालयाच्या ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र पश्चिम विभागा’च्या वतीने उगवे, पेडणे येथे औषधी वनस्पतींचे वाटप आणि लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आजूबाजूच्या गावातील सुमारे २५ शेतकरी उपस्थित होते. क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभागाचे संचालक आणि  सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांनी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. औषधी वनस्पतींच्या लागवडीपासून उत्पन्न कसे मिळवावे, या वनस्पती आंतरपीक म्हणून कशा लावाव्यात, यांची बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, यांविषयी डॉ. मोकाट यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. या वेळी सा. फु. पुणे विद्यापिठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अविनाश आडे, तसेच क्षेत्रीय सहसुविधा केंद्र पश्चिम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उगवे पेडणे येथील प्रगतीशील शेतकरी श्री. प्रमोद महाले यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थित शेतकरीवर्ग

‘आयुष आपके द्वार’ या योजनेअंतर्गत आयुष मंत्रालयाने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर ७५ लक्ष औषधी वनस्पती लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अंतर्गत क्षेत्रीय सहसुविधा केंद्र पश्चिम विभागाने ७५ सहस्र औषधी वनस्पतींचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.