सातारा जिल्ह्यातील ५ साखर कारखाने काळ्या सूचीत !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २९ सप्टेंबर (वार्ता.) – साखर आयुक्तांनी सातारा जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांचा काळ्या सूचीत समावेश केला आहे. शेतकर्‍यांनी काळी सूची पाहूनच त्या कारखान्यांना ऊस गाळपास देतांना काळजी घ्यावी, असे आवाहन ‘बळीराज शेतकरी संघटने’चे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यातील किसन वीर सहकारी कारखाना, भुईंज; खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी; गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड (जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना); स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड, उपळवे आणि ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड, गोपूज या ५ साखर कारखान्यांचा समावेश काळ्या सूचीत करण्यात आला आहे.

मुल्ला पुढे म्हणाले की, साखर आयुक्तांनी वर्ष २०२०-२१ च्या गाळप हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी एफ्.आर्.पी. (किमान आधारभूत मूल्य) दिलेला नाही किंवा एफ्.आर्.पी. देण्यास विलंब केला आहे, अशा साखर कारखान्यांची सूची प्रसिद्ध केली आहे. याविषयी आम्ही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आभार मानतो. राज्यातील साखर कारखान्यांनी प्रारंभी गाळप झालेल्या उसाचा अतिरिक्त दर दिला; मात्र नंतर गाळप झालेल्या उसाची देयके वेळेत दिली नाहीत. काही कारखान्यांनी तर देयके दिलीच नाहीत. दुर्दैवाने त्यामध्ये राज्यातील खासदार आणि आमदार यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.