केरळमध्ये तालिबानी समर्थकांमध्ये होत आहे वाढ ! – माकपच्या अंतर्गत पत्रकामध्ये उल्लेख

केरळमध्ये धर्मांधांची मते मिळवून माकप सत्तेत आला आहे. त्यामुळे तालिबानी समर्थकांची संख्या वाढत आहे, अशा आशयाची अंतर्गत पत्रके काढण्याच्या पलीकडे जाऊन माकपवाले काहीही करणार नाहीत. त्यामुळे केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक ! – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये तालिबानच्या समर्थकांमध्ये वाढ होत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. वास्तविक मुसलमान समाजासह जगभरामध्ये तालिबानची निंदा होत आहे, अशा प्रकारचा उल्लेख मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत पत्रकामध्ये करण्यात आल्याची माहिती ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तात देण्यात आली आहे.

१. या पत्रकामध्ये दावा करण्यात आला आहे की, सुशिक्षित महिलांना तालिबानी विचारांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ ही संघटना लोकांच्या धार्मिक भावना भडकावण्याचे काम करत आहे. यासाठी ही संस्था सामाजिक माध्यमांचा वापर करत आहे. तिचा उद्देश इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याचा आहे.

२. या पत्रकामध्ये पुढे म्हटले आहे की, मुसलमानांसह अन्य समाजामध्ये हे विचार पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ख्रिस्त्यांना मुसलमानांच्या विरोधात भडकावण्याचाही प्रयत्न यातून केला जात आहे

३. माकपच्या कार्यकारी समितीचे सदस्य एम्.ए. बेबी यांनी सांगितले की, हे सत्य आहे की, आमच्या पक्षाच्या पत्रकांमध्ये धार्मिक आणि कट्टरतावादी शक्तींपासून सावध रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघ परिवाराच्या कार्यामुळे अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावना तीव्र होत आहेत. रा.स्व. संघाच्या कार्यामुळे अल्पसंख्य समुदायाचा एक वर्ग हाही त्याच प्रकारच्या सूडाच्या दिशेने आकर्षित होईल आणि संघाची नक्कल करील. (संघ परिवारामुळे नाही, तर धर्मांधांमध्ये उपजत धर्मांधता असल्याने ते जिहादी कारवाया यापूर्वी करत होते आणि आताही करत आहेत. संघ आणि भाजप नव्हता तेव्हापासून हे होत आहे; मात्र धर्मांधांना पाठीशी घालण्यासाठी अशा प्रकारचा हिंदुद्वेषी तर्क काढण्याचा प्रयत्न साम्यवादी करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) आपल्याला याकडे लक्ष द्यायला हवे की, कोणत्याही इस्लामी देशांपेक्षा भारतामधील मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे. (असे सांगून हिंदूंना भीती दाखवण्याचा प्रयत्न साम्यवाद्यांकडून केला जात आहे. मोगलांना पराभूत केल्याचा आणि जिहाद्यांना धडा शिकवल्याचा हिंदूंचा इतिहास आहे, हे साम्यवाद्यांनी लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक)

४.  जमातचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महंमद सलीम इंजिनियर यांनी म्हटले की, ‘जमात-ए-इस्लामी हिंद’विषयी अपसमज पसरवले जात आहेत. यामागे राजकीय लाभ उठवण्याचा उद्देश आहे. आमचा उद्देश धार्मिक आणि विभाजनकारी लोकांच्या विरोधात लढण्याचा आहे.

५. जमातचे सचिव सैयद तनवीर अहमद यांनी म्हटले की, ‘आम्ही तालिबानी विचारांचा प्रसार करतो’, असा आरोप करणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या आरोपांमुळे हिंदु आणि मुसलमान यांच्यातील दरी वाढते आणि त्याचा लाभ काही राजकीय पक्ष घेतात.