गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

‘आज भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (उत्तर भारतानुसार आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी) (२८.९.२०२१) या दिवशी सनातनच्या ६३ व्या संत जोधपूर येथील  पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचा ७१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जोधपूर, राजस्थान येथे रहाणारे त्यांचे कुटुंबीय आणि ठाणे, महाराष्ट्र येथे रहाणारी त्यांची मोठी बहीण यांना पू. सुशीला मोदी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) सुशीला मोदी

७१ व्या वाढदिवसानिमित्त पू. (श्रीमती) सुशीला मोदी  यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

मागे बसलेले डावीकडून श्री. शीतल मोदी, सौ. स्वाती शीतल मोदी, पू. (श्रीमती) सुशीला बंकटलाल मोदी, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कै. बंकटलाल मोदी, सौ. राखी शैलेश मोदी आणि श्री. शैलेश मोदी.
खाली बसलेल्या डावीकडून कु. साक्षी मोदी, कु. सान्वी मोदी, कु. वेदिका मोदी आणि कु. अनन्या मोदी

श्री. शीतल बंकटलाल मोदी (पू. सुशीला मोदी यांचे ज्येष्ठ पुत्र, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) 

१. पू. आईला असलेला सेवेचा ध्यास

‘पू. आई कोणतीच सेवा अर्धवट स्थितीत ठेवत नाही. जोपर्यंत सेवा परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत ती शक्य ते सर्व प्रयत्न करते. त्यासाठी ती दिवस-रात्र एक करते.

२. धर्मशिक्षण देण्याची तळमळ

२ अ. पू. आई एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला जाते. तेव्हाही ती ‘समाजाला धर्मशिक्षण कसे मिळेल ?’ याचाच विचार करत असते.

२ आ. वडिलांच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी प्रतिदिन पू. आईने सत्संगाचे आयोजन करणे : २२.७.२०२१ या दिवशी माझ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आई पुष्कळ स्थिर होती. तेव्हा १२ दिवस कुटुंबातील ७० ते ८० सदस्य प्रतिदिन एकत्रित महाप्रसाद घ्यायचे. त्या वेळी ‘त्या सर्वांनाही धर्मशिक्षण कसे मिळेल ?’, अशी तिला तळमळ होती. ती प्रतिदिन एका सत्संगाचे आयोजन करायची.

२ इ. पू. आई नामजप करतांना येणार्‍या अनुभूती : पू. आई नामजप करत असतांना तिच्या मुखावर एक वेगळेच तेज दिसते. तेव्हा ‘ती नामाशी एकरूप झाली आहे’, असे वाटते. त्या वेळी तिच्याकडे पाहिल्यावर स्थिरता, शांती आणि आनंद यांची अनुभूती येते.’

डॉ. (सौ.) स्वाती शीतल मोदी  (पू. सुशीला मोदी यांची मोठी सून)

१. सुनेची सेवा करतांना पू. आईंचा भाव !

‘मी रुग्णाईत असतांना पू. आई माझी सेवा ‘गुरुसेवा’  समजून करतात.

२. पू. आईंचा धनाप्रती भाव !

पू. आई स्वतःसाठी कधीही पैसे खर्च करत नाहीत. ‘आपल्याकडील सर्व धन ईश्वराचे आहे आणि गुरुसेवेसाठीच त्याचा वापर व्हायला पाहिजे’, असा त्यांचा विचार असतो.

३. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी  पू. आईंनी अर्पणदात्याला भेटायला जाणे आणि त्या वेळी ‘संतांचे विचार आणि कृती यांमध्ये  गुरूंची संकल्पशक्ती कार्यरत असते’, असे वाटणे

सासर्‍यांच्या मृत्यूनंतरही त्यांची साधनेची तळमळ न्यून झाली नाही. संतांचे विचार आणि त्यांची कृती इतरांपेक्षा वेगळ्या असतात. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर एकदा घरात पुष्कळ गडबड चालू होती. पुष्कळ लोक भेटायला येत होते. तेव्हा पू. आईंना एका अर्पणदात्याला भेटायला जायचे होते. मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही भ्रमणभाषवरून अर्पणदात्यांशी बोलून घेऊ शकता !’’ तरीही पू. आई तेथे गेल्या. त्या दिवशी ते अर्पणदाते त्यांना भेटले आणि त्यांनी अर्पणही दिले. त्या वेळी ‘संतांचे विचार आणि कृती यांमध्ये गुरूंची संकल्पशक्तीच कार्यरत असते’, असे मला वाटले.

४. पू. आईंच्या अस्तित्वाने चैतन्य मिळणे

मी कधी कधी पू. आईंच्या जवळ असतांना माझी चिडचिड आणि अन्य स्वभावदोष वाढतात. तेव्हा ‘पू. आई मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहेत आणि माझे प्रारब्ध नष्ट करत आहेत’, असे मला जाणवते. त्या जवळ असतांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटते.’

श्री. शैलेश बंकटलाल मोदी  (पू. सुशीला मोदी यांचे कनिष्ठ पुत्र)

१. ‘सर्व कुटुंबियांची सेवा व्हावी’, ही तळमळ असल्याने पू. आईने वडिलांकडूनही सेवा करवून घेणे

‘घरातील सर्वांची सेवा व्हावी’, असा पू. आईचा नेहमी प्रयत्न असतो. ज्याला जी सेवा आवडते, त्याच्याकडून आई ती सेवा करून घेते. माझ्या वडिलांना पैसे मोजून ते व्यवस्थित ठेवायला आवडायचे. पू. आई वडिलांना सेवेशी संबंधित (विज्ञापने, अर्पण आदींचे) पैसे मोजून ते व्यवस्थित ठेवण्याची सेवा करायला सांगत असे. जेणेकरून त्यांचीसुद्धा सेवा होईल. घरातील व्यक्ती एखाद्या कामासाठी बाहेर जात असेल, तर ‘त्या भागात कोणती सेवा होऊ शकते’, याचा विचार करून पू. आई तिला सेवा देते.

२. ‘ईश्वरेच्छा’ असा विचार करून परिस्थिती स्वीकारणे

पू. आईचे प्रसारासाठी बाहेर जाण्याचे नियोजन असतांना त्याच वेळी घरातील अन्य व्यक्तींनाही बाहेर जायचे असल्यास तिला कधीच राग येत नाही. ‘ईश्वराची इच्छा’, असा विचार करून ती स्वत:ची दैनंदिन कामे करायला आरंभ करते.

३. पू. आईने या वयातही सेवेसाठी दुचाकी गाडी शिकण्याची इच्छा व्यक्त करणे

सेवेला जाण्यासाठी आईला गाडीच्या चालकावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे ती नेहमी म्हणते, ‘‘मलासुद्धा दुचाकी गाडी शिकवा, म्हणजे मला इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.’’

४. वडिलांच्या मृत्यूनंतर पू. आई स्थिर रहाणे आणि कुटुंबियांना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे

वडिलांच्या मृत्यूनंतर आई स्थिर राहून आम्हाला सांभाळत होती. २ दिवसांनंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. त्यामुळे तिचे मन त्या कार्यक्रमाकडे होते. घरातील सदस्यांनाही त्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा ती प्रयत्न करत होती.

५. साधकांमध्ये गुरुरूप पहाणे

घरात साधक आले की, तिला आनंद होतो. ती साधकांसाठी स्वतः स्वयंपाक करून स्वतः त्यांना वाढते. ‘साक्षात् गुरुच घरी आले आहेत’, असा भाव ठेवून ती साधकांचे आदरातिथ्य करते.’

सौ. राखी शैलेश मोदी (पू. सुशीला मोदी  यांची लहान सून, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. काटकसरीपणा

‘पू. आई घरातील कोणताही पदार्थ वाया जाऊ देत नाहीत. ‘घरात पाणी पुष्कळ असले, तरी आवश्यक आहे, तेवढेच वापरायचे’, असे त्या आम्हाला सांगतात.

२. वर्तमानात रहाणे

कधी कधी त्यांच्याकडे एकाच वेळी ३-४ सेवा येतात, तरी त्यांचे मन विचलित होत नाही. त्या वेळी मन शांत ठेवून  पू. आई प्राधान्यक्रमानुसार सेवा करतात.

३. अर्पणदात्याविषयी भाव

पू. आई समाजात अर्पण आणण्यासाठी जातात. तेव्हा त्यांच्या मनात ‘या माध्यमातून अर्पणदात्याचा उद्धारच होणार आहे’, असा भाव असतो. त्या प्रत्येक अर्पणदात्याची आठवण ठेवतात आणि त्याच्याकडून त्याग करवून घेतात.

४. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरुरूप पहाणे

पू. आई नोकराला जेवण वाढतांनासुद्धा ते व्यवस्थित गरम करून वाढतात. त्या प्रत्येकात ईश्वर किंवा गुरु यांचे रूप पहातात आणि त्याच्यासाठी सर्व कृती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात.

५. गुरुसेवेची तळमळ

अ. आम्हाला सेवा करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी त्या आम्हाला स्वयंपाकाच्या सेवेत साहाय्य करतात.

आ. त्यांना शारीरिक त्रास होत असतांनाही त्या गुरुसेवेलाच प्राधान्य देतात. ‘कुणीही जिज्ञासू साधनेपासून वंचित राहू नये’, अशी त्यांची तळमळ असते.

६. पू. आईंना केवळ गुरुसेवेचाच ध्यास असल्याने मायेतील गोष्टींचे त्यांना विस्मरण होणे

पू. आईंनी ३-४ वर्षांपूर्वी सेवेनिमित्त संपर्क केलेल्या एखाद्या व्यक्तीचे नाव आणि तिची संपूर्ण माहिती त्यांच्या लक्षात असते; परंतु व्यवहारातील किंवा मायेतील २ – ३ दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग त्यांच्या लक्षात रहात नाही.’

सौ. माला मुंदडा (पू. सुशीला मोदी  यांची मोठी बहीण) ठाणे, महाराष्ट्र.

सौ. माला मुंदडा

१. ‘श्रीमती सुशीला मोदी प्रत्येक काम वेळेवरच पूर्ण करते.

२. नामजपाची  आठवण करून देणे

ती मला नामजपाचे महत्त्व समजावून सांगते. माझे साधनेचे प्रयत्न अल्प झाल्यास ती मला भ्रमणभाषवरून आठवण करवून देते.

३. ‘गुरुदेव सर्वकाही ठीक करतील’, असा भाव असल्याने कठीण प्रसंगीही पू. सुशीला स्थिर राहू शकणे

सुशीला प्रत्येक कृती करतांना गुरुदेवांप्रती भाव ठेवून करते. ती प्रत्येक क्षणी भावावस्थेत असते. कोणत्याही परिस्थितीत ती डगमगत नाही आणि ‘गुरुदेव सर्वकाही ठीक करतील’, असे म्हणून ती स्थिर रहाते. तिचे यजमान बंकटलाल मोदी यांचे देहावसान झाले. अशा संकट काळाच्या प्रसंगातसुद्धा ती स्थिर राहून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत करून सर्वांना शांत करत होती.

४. अनुभूती

‘सुशीला संत आहे. त्यामुळे तिच्या आगमनामुळे वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन वातावरण प्रसन्न होते’, अशी मला अनुभूती येते.’

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.९.२०२१)

पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचे आध्यात्मिक उन्नती केलेले कुटुंब !


पू. सुशीला मोदी यांच्या नातींना संत-आजीविषयी जाणवलेली वैशिष्ट्ये !

कु. साक्षी शीतल मोदी (वय २१ वर्षे) (पू. सुशीला मोदी यांच्या मोठ्या मुलाची मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. स्वतःला पालटण्याची वृत्ती

‘पू. आजीला कुणी तिची चूक सांगितली, तर ती त्वरित स्वीकारते. त्यानंतर पुन्हा तसा काही प्रसंग घडल्यास ती स्वतःचे निरीक्षण करते आणि ‘यात माझी काय चूक झाली ?’,  असे मला विचारते.

२. शिकण्याची तळमळ

पू. आजी या वयातही सामाजिक माध्यमांतील (‘सोशल मिडिया’वरील) ‘ट्विटर आणि व्हॉॅट्सॲप’ यासंबंधीच्या सेवा करण्यास शिकली आहे. ‘ट्विटर ट्रेंड’मध्ये ती नेहमी सहभाग घेते. तिला अधिकाधिक सेवा करण्याची तळमळ असते.

३. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला भाव

पू. आजीने  स्वतःला संपूर्णपणे गुरुचरणी अर्पण केले आहे. तिचा गुरुदेवांप्रती ‘मी ईश्वराची आहे आणि ईश्वर माझा आहे’, असा समर्पणभाव आहे. ‘प्रत्येक कृती गुरूच करवून घेत आहेत’, या विचारामुळे ती नेहमी कृतज्ञताभावात रहाते.’

कु. अनन्या शैलेश मोदी (वय १९ वर्षे) (पू. सुशीला मोदी यांच्या लहान मुलाची मोठी  मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

१. कुटुंबियांची साधना व्हावी, याची पू. आजीला तळमळ असणे

‘कुटुंबातील सर्वांची साधना होत आहे ना ?’, याकडे  पू. आजीचे सतत लक्ष असते. कुणी साधनेत न्यून पडत असेल किंवा कुणाला सेवा करण्यात काही अडचण असेल, तर ती लगेच साहाय्य करते आणि योग्य दिशा देते. ती आम्हाला नेहमी सनातनची नियतकालिके आणि ग्रंथ वाचण्यास सांगते; कारण आमचा वेळ दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात वाया जाऊ नये.

२. प्रत्येकाच्या आवडीचा विचार करून त्याला खाऊ देणे

पू. आजीला सर्वांची आवड-नावड लक्षात रहाते. कधी कुणाच्या आवडीचा पदार्थ बनवला असेल, तर ती त्याच्यासाठी वेगळे काढून ठेवते आणि त्याला खाऊ घालते. प्रत्येकाच्या वाढदिवसाला ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवते.

३. ‘अन्य साधकांना अडचण येऊ नये’, असा विचार करणे

आजोबांच्या मृत्यूनंतरही पू. आजी आम्हाला ‘सेवा परिपूर्ण करायची आहे’, याची जाणीव करून देत होती. ‘आपल्यामुळे अन्य साधकांना अडचण येऊ नये’, असा तिचा विचार होता.’

कु. वेदिका शैलेश मोदी (वय १४ वर्षे) (पू. सुशीला मोदी यांच्या लहान मुलाची लहान  मुलगी, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के)

१. ईश्वराप्रती दृढ श्रद्धा असणे

‘मला आणि माझ्या आईला (सौ. राखी मोदी यांना) कोरोनाचा संसर्ग झाला होता. आईची प्रकृती बिघडत चालली होती. त्यामुळे माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती. तेव्हा पू. आजीने या प्रसंगात सकारात्मक राहून मला समजावले, ‘‘ईश्वराच्या कृपेने सगळे ठीक होईल. या स्थितीतही ईश्वर तुझी आध्यात्मिक उन्नती करवूनच घेईल. देवाने तुला नामजप करण्यासाठी वेळ दिला आहे. त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून निरंतर साधना करत रहा.’’ यावरून तिची ईश्वरावरील श्रद्धा दिसून येते.

२. गुरुसेवा करतांना पूर्णपणे एकाग्र होणारी पू. आजी !

पू. आजी प्रत्येक सेवा करतांना गुरुस्मरण करते आणि त्या सेवेत पूर्णपणे मग्न होऊन जाते. त्या वेळी तिला सेवेच्या व्यतिरिक्त अन्य काही सुचत नाही.

३. पू. आजीचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला भाव

अ. गुरुदेवांकडून किंवा आश्रमातून (‘सनातन प्रभात’मधून) एखादी सूचना आली, जी साधनेशी संबंधित असो किंवा ते धर्मप्रसारासाठीचे सूत्र असो, पू. आजी ‘हा माझ्या गुरूंचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवून त्या सूचनेचे पूर्णपणे पालन करते.

आ. सेवा करतांना स्वतःकडून काही चूक होऊ नये, यासाठी पू. आजी नेहमी सहसाधकांना विचारून सेवा करते. ती नेहमी म्हणते, ‘‘माझ्या गुरूंच्या धर्मकार्यात कोणतीच चूक व्हायला नको. सेवेत चुका होणे परात्पर गुरुदेवांना अपेक्षित नाही.’’

कु. सान्वी शीतल मोदी (वय १० वर्षे) (पू. सुशीला मोदी यांच्या मोठ्या मुलाची लहान  मुलगी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. इतरांना त्वरित साहाय्य करणे

‘पू. आजीकडे कधीही साहाय्य मागितले, तर ती आम्हाला त्वरित साहाय्य करते. आम्हाला एखादी वस्तू सापडत नसेल, तर पू. आजी ते शोधून देण्यास साहाय्य करते.’

२. पू. आजीमध्ये पुष्कळ गुण आहेत. मला अशी आजी मिळाली, त्यामुळे मी धन्य झाले आहे. आजीमुळेच माझी साधना होत आहे.

आजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करते, ‘तिची साधना आणखी चांगल्या प्रकारे होऊ दे आणि तिला ईश्वरप्राप्ती होऊ दे.’

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ६.९.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक