ठेवीदारांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याच्या ‘रूपी बँके’ला सूचना !

ठेव विमा महामंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

पुणे, २६ सप्टेंबर – सुधारित ठेव विमा महामंडळ कायद्यानुसार ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या ठेवींची रक्कम परत करण्याविषयी ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ‘रूपी सहकारी अधिकोषास’ सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ५ लाखांपर्यंत ठेवी असणा‍र्‍या ठेवीदारांचे अनुमाने ९६५ कोटी रुपये लवकरच परत मिळतील, अशी माहिती अधिकोषाकडून देण्यात आली. या निर्णयामुळे गेल्या ८ वर्षांपासून संघर्ष करणार्‍या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

अधिकोषाच्या सर्व ठेवीदारांनी अधिकोषांच्या शाखेमध्ये उलपब्ध केलेल्या विहित नमुन्यातील दावा अर्ज २ प्रतींमध्ये सादर करण्याचे आवाहन ‘रूपी बँके’चे सरव्यवस्थापक नितिन लोखंडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे, तसेच ठेव विमा महामंडळाच्या निर्णयानुसार चिंचवडमधील ‘श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँके’च्या ठेवीदारांनाही ५ लाखांपर्यंतच्या ठेव रकमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.