भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे ! – अमेरिका

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी शिफारस केली आहे.  भारताचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ सदस्य देशांचीही (अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) यास सहमती आहे. यासह इतर अनेक देशांना भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य मिळाल्याचे पहायचे आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दिली.

१. भारत वर्ष १९५० – १९५१, १९६७ – १९६८, १९७२ – १९७३, १९७७ – १९७८, १९८४ – १९८५, १९९१ – १९९२ आणि २०११ – २०१२ या कालावधीत ७ वेळा सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. १ जानेवारी २०२१ पासून भारत पुन्हा अस्थायी सदस्य असून तो ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत रहाणार आहे.

२. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १५ सदस्य देशांचा समावेश आहे. यांपैकी अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन हे ५ देश कायमस्वरूपी सदस्य असणार्‍या देशांच्या सूचीत आहेत, तर १० अस्थाई देश दर २ वर्षांनी पालटतात. जगभरातील १९३ देश या १० देशांची मतदानाद्वारे निवड करतात. सध्या, ब्राझिल, मेक्सिको, नॉर्वे, आयर्लंड, गॅबॉन, घाना, केनिया, संयुक्त अरब अमिरात, अल्बानिया आणि भारत हे देश या परिषदेचे अस्थायी सदस्य आहेत.

३. सुरक्षा परिषदेचा एक अस्थायी सदस्य निवडण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत मिळणे आवश्यक आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाने होते. यामध्ये आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिक देशांसाठी ५ जागा आरक्षित आहेत.