कराड येथे टीव्ही चोरीच्या प्रकरणी २ जणांना कह्यात घेतले !

कराड, २६ सप्टेंबर (वार्ता.) – कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार संजय लादे यांनी टीव्ही चोरीच्या प्रकरणी २ संशयितांना गजाआड केले आहे. लादे हे खासगी कामानिमित्त न्यायालय परिसरात गेले असता त्यांना २ युवक संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून बीट मार्शलना बोलावून घेतले. संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २ एल्ईडी टीव्ही आढळून आले. याविषयी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून अधिक तपास केला असता हे टीव्ही कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरले असल्याची माहिती दिली. याविषयी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार लादे हे सुटीवर असूनही त्यांनी हे कर्तव्य बजावले आहे.