पंतप्रधान मोदी यांच्याकडून अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा

  • भारताच्या दौर्‍यावर येण्याचे आमंत्रण

डावीकडून उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. या वेळी हॅरिस म्हणाल्या की, भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत करून मला पुष्कळ आनंद झाला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहेत. ‘जर तुम्ही (हॅरिस) भारताच्या दौर्‍यावर आलात, तर संपूर्ण देश पुष्कळ आनंदी होईल. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुमची निवड हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग होता. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात. मला विश्‍वास आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील.

यावर कमला हॅरिस यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिका यांनी एकमेकांसमवेत काम केल्याने दोन्ही देशांच्या लोकांवरच नव्हे, तर जगावर खोल परिणाम होईल.