- दोघांवर गुन्हा नोंद करून टेम्पो पोलिसांच्या कह्यात !
- गोवंशियांना गोपुरी आश्रमात ठेवले !
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, तसेच फोंडाघाट या ठिकाणांहून पश्चिम महाराष्ट्रात हत्येसाठी गुरे नेण्याचा प्रकार गेले अनेक दिवस चालू आहे.
२० सप्टेंबरला रात्री ९ वाजता खारेपाटण येथून मुरगुडला (जिल्हा कोल्हापूर) जाणारा टेम्पो पोलीस आणि ग्रामस्थ यांनी अडवून तपासला असता, त्यात ६ बैल कोंबून ठेवल्याचे निदर्शनास आले. या वेळी टेम्पोचा चालक प्रवीण बाळासो घोटणे याने हे गोवंशीय हत्येसाठी मुरगुड नेत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी चालक घोटणे आणि त्याचा सहकारी वैभव सुखदेव रामाने (दोघेही रहाणार मुरगुड, जिल्हा कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फोंडाघाट बाजारपेठेत एका ‘बोलेरो पिकअप’ वाहनातून गुरांच्या हंबरण्याचा आवाज आल्याने तेथील युवकांनी तात्काळ फोंडाघाट पोलीस तपासणी नाक्यावर याची माहिती दिली. कोल्हापूरला जाणारा हा टेम्पो पोलीस तपासणी नाक्यावर आल्यावर पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली असता ६ बैल कोंबून भरलेले पोलिसांना आढळले. टेम्पोच्या मागोमाग आलेले काही ग्रामस्थ आणि पोलीस यांनी टेम्पोचालकाकडे चौकशी केली असता त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली; मात्र अखेर चालकाने बैलांना मुरगुड येथे हत्येसाठी नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी कागदपत्रांची चौकशी केली असता चालकाकडे प्राण्यांची वाहतूक करण्याची अनुमती आणि वाहन चालवण्याची अनुमती नव्हती, तसेच वाहनाचा विमाही काढलेला नव्हता, असे स्पष्ट झाले.
पोलीस तपासणी नाक्यावरील पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपींच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम आणि मोटार वाहन अधिनियम या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आणि कह्यात घेतलेला गोवंश पोलिसांनी कणकवलीतील गोपुरी आश्रमात ठेवला.