आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गर्दी न करण्यासाठी केलेली विनंती कार्यकर्त्यांनी धुडकावली !
|
हिंगोली – येथील शासकीय विश्रामगृहात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुष्कळ गर्दी केली होती. ही गर्दी अल्प करण्यासाठी मंत्री राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांसमोर हात जोडून विनंती केली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मंत्र्यांसमोरच कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली.
आरोग्यमंत्री टोपे शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर एका कक्षामध्ये त्यांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला; मात्र सत्कारासाठी आलेले कार्यकर्ते स्थानिक पदाधिकार्यांचेही ऐकत नव्हते. (पदाधिकारी आणि नेते यांचे न ऐकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेचे कधी ऐकतील का ? ते जनतेशी कसे वागत असतील, याची यातून कल्पना येते ! – संपादक)