वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल !

१. भारताने नेतृत्व करून जाज्वल्य अस्मिता तरुण पिढीत विकसित करावी !

‘आमच्या थोर आणि पावन भारतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा आपल्या पाठीशी उभी आहे. त्याची लाज कशाकरता? ही तर आमची तेजःपुंज ज्वलंत अस्मिता आहे. जगाला ही वैशिष्ट्येच शिकवायची आहेत. भारताने नेतृत्व करायचे आहे. ही जी ज्वलंत आणि जहाल अस्मिता आहे, तीच आमच्या तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील.

२. भारताची राज्यव्यवस्था आणि शासन आंग्लाळलेल्या वर्गांकडून सिद्ध झाल्याने मूळ आदर्श अन् मानदंड छिन्न-भिन्न !

भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा युरोपीय संस्कृतीने नखशिखांत ग्रासलेल्या भारतियांच्या (म्हणजे आंग्लाळलेल्या पाश्चात्त्यांचे बूट चाटणार्‍यांच्या) हाती निर्णय आणि सत्ता आली. ब्रिटीश राजवटीने भारताची राज्यव्यवस्था आणि शासन जे सिद्ध केले, त्याच्या चौकटीतूनच हा आंग्लाळलेला वर्ग सत्ताधारी बनला. त्यामुळे त्याने आमचे मूळ आदर्श आणि मानदंड छिन्न-भिन्न केले.

३. ‘आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत शिकवणे आवश्यक !

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल; पण आपण ते कसे मान्य कराल ? पुरोगाम्यांच्या आणि नेहरूवाद्यांच्या राजकीय संघटना अन् त्यांचे कार्य केवळ सत्तेकरता आणि स्वार्थाकरता आहे. सत्ता हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. भारताची समाजरचना अभ्यासली गेली का ? प्राचीन समाज रचनाशास्त्रांचा हिंदु समाजाला भक्कम आधार आहे. त्याची उपेक्षा करू नका. कमरेचे डोक्याला गुंडाळू नका. आतातरी हिंदूंनी अंतर्मुख होऊन विचार करावा. शाळा, महाविद्यालये आणि विश्वविद्यालये यांतील पाठ्यपुस्तके अन् अभ्यास पुस्तकांतून हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हद्दपार करून ‘आर्य हेच या भूमीचे अधिपती, ते इथलेच, आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत त्यांनी मांडला, शिकवला आणि सांगितला, तरच हिंदूंना तरणोपाय आहे, अन्यथा हिंदूंसारखे करंटे हिंदूच !

४. हिंदु स्त्रिया राष्ट्रीय धन असल्याने त्या पुरुषी होता कामा नयेत !

पाश्चात्त्य शिक्षणाने आम्ही पुरुष श्रद्धाहीन झालोच आहोत. आमच्या धर्मपरंपरा, रितीरिवाज आणि कुलाचारादि परंपरा अशा प्रत्येक आचाराविषयी संशय अन् अश्रद्धा हा आमचा स्वभाव झाला आहे. महिला विद्यापीठ स्थापन करून आपण तीच अश्रद्धा आणि तशीच संशयवृत्ती स्त्रियांत निर्माण करावी का ? कर्तव्याच्या शिक्षणपद्धतीवर लोकमान्य टिळकांचा हाच आक्षेप आहे. आमच्या सनातन धर्म आणि संस्कृती यांवर स्त्रियांची नितांत निष्ठा आहे. ती निष्ठा भग्न करायची का ? हिंदु स्त्रिया या आमचे राष्ट्रीय धन आहे. त्या पुरुषी होता कामा नयेत. त्यांचा नाश आम्ही होऊ देता कामा नये.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०२१)