कोल्हापूर, २० सप्टेंबर – केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या अयोग्य वापराविषयी मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपचे नेते मला कसे थांबवता येईल ? याचा प्रयत्न करत होते. चंद्रकांत पाटील यांना सातत्याने चिंता वाटते की, आपण प्रदेशाध्यक्ष आहोत त्या जिल्ह्यामध्ये भाजप भुईसपाट झालेला आहे. याला मी कारणीभूत आहे. या दृष्टीकोनातून किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमागे भाजपचे मोठे षड्यंत्र आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच त्याचे खरे ‘मास्टरमाईंड’ आहेत, असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. सोमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘‘माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असून मी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुहानीचा दावा दाखल करणार आहे. ‘ब्रिक्स इंडिया’ आस्थापनाशी माझा आणि माझ्या जावयाचा काहीही संबंध नाही.’’