राज्यात तिपटीने रुग्ण वाढले !
मुंबई, १८ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात कोरोनासमवेत आता डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून शासनाने १५ महानगरपालिकांना तातडीची पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकांना ‘ब्रिडिंग साईट चेकर्स’ची (डेंग्यूच्या डासांची पैदास होणार्या ठिकाणांचे सातत्याने परीक्षण करणारे लोक) नियुक्ती करण्याचेही निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. मागील वर्षी याच काळातील रुग्णांच्या तुलनेत यंदा या दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे आणि नाशिक येथे चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत.
राज्यशासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात १४ सप्टेंबरपर्यंत ६ सहस्र ३७४ डेंग्यूचे, तर १ सहस्र ५३७ चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. ११ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीची तुलना केली, तर याच काळात गेल्या वर्षी डेंग्यूचे २ सहस्र २९ रुग्ण, तर चिकुनगुनियाचे फक्त ४२२ रुग्ण होते. त्यामुळे आकडेवारीनुसार डेंग्यु आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये साधारणपणे तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
डासांची पैदास तपासणारे हे परीक्षक प्रतिदिन २०० घरांमध्ये पडताळणी करणार आहेत. या कामासाठी एकूण ३९ लाख ३८ सहस्र रुपयांचा निधी देण्यात आला आहे. (यात भ्रष्टाचार होणार नाही, याची शाश्वती कोण देणार ? – संपादक) पुणे महानगरपालिका क्षेत्रात ७० कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, तर नाशिक, पिंपरी चिंचवड, ठाणे, कोल्हापूर आणि इतर काही महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी २५ कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नागपूर आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी अशा ७० कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे.