‘१०.९.२०२१ या दिवशी दुपारी ३ वाजता मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर यांच्याकडे गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी बसवलेल्या गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. मी घरी येणार, म्हणून त्यांचा मुलगा आणि बालसंत पू. वामन (वय ३ वर्षे) यांना पुष्कळ आनंद झाला होता. त्यांच्या घरी गेल्यावर मी अनुभवलेली त्यांची प्रीती पुढीलप्रमाणे होती.
१. मी घरी आल्या आल्या पू. वामन यांनी त्यांच्या बोबड्या आवाजात मला विचारले, ‘‘सद्गुरु गाडगीळकाका, तुम्ही जेवणार ना ?’’ ते ऐकून त्यांची आई मला म्हणाली, ‘‘तुम्ही येणार म्हणून पू. वामन जेवले नाहीत. त्यांना तुमच्यासमवेत जेवायचे होते.’’ पू. वामन एवढे लहान असूनही त्यांचा माझ्याप्रती असलेला भाव पाहून मला खूप गहिवरून आले आणि कृतज्ञता वाटली.
२. मी गणपतीचे दर्शन घेतांना ते माझे निरीक्षण करत होते. मी गणपतीचे भावपूर्ण दर्शन घेतल्याचे बघून त्यांना पुष्कळ आनंद झाला.
३. मी आश्रमातून त्यांच्यासाठी नेलेला खाऊ त्यांच्या हातात दिला. तेव्हा त्यांना आश्रमातील खाऊ मिळाल्याबद्दल पुष्कळ आनंद झाला. त्यांनी मी दिलेला खाऊ आई-बाबांना दाखवला.
४. मी बसल्यावर पू. वामन यांनी त्यांची खेळणी आणली आणि मला दाखवली. त्यामध्ये विविध प्रकारच्या गाड्या होत्या. ‘कोणती चारचाकी गाडी कुणाची ?’, हे त्यांनी आधीच ठरवले होते. नारायण (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पू. वामन ‘नारायण’ म्हणतात), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गाड्या ठरवल्या होत्या. मला एक गाडी दाखवून ते म्हणाले, ‘‘या गाडीत तुम्ही आणि मी बसायचे. मी गाडी चालवणार आणि तुम्ही माझ्या बाजूला बसणार.’’ त्यांनी माझ्यासोबत गाडीत बसायचे नियोजन केले होते आणि स्वतः गाडीचे सारथ्य स्वीकारले होते. यातून त्यांची माझ्याशी असलेली जवळीक दिसून येत होती, तसेच गाडीचा चालक बनून त्यांनी स्वतःकडे लघुत्व घेतले होते.
५. काही वेळ वेगवेगळ्या गाड्या दाखवून आणि ‘त्या कशा चालतात ?’, हे दाखवल्यावर ते मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. त्यांच्या खोलीत त्यांनी पुठ्ठ्याने सिद्ध केलेली नारायण (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची खोली मला दाखवली. आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत त्यांचा पलंग, पटल (टेबल), आसंदी (खुर्ची) इत्यादींची जशी रचना आहे, तशी रचना पू. वामन यांनी त्या खोलीत केली होती. त्यानंतर पू. वामन यांनी मला खाली गादीवर बसवले आणि खोलीतील सर्व वस्तू अन् अन्य खेळणी दाखवली. यातून पू. वामन यांचा ‘एखाद्याचा आदर कसा करायचा ?’, हा गुण लक्षात आला. त्यांनी मला आधी खाली बसायला सांगितले आणि मगच सर्व दाखवले. हे सर्व दाखवतांना त्यांना होत असलेला आनंद मला त्यांच्या मुखावर दिसत होता. ‘यांना काय दाखवू आणि काय नको’, असे त्यांना झाले होते.
६. पू. वामन यांच्या वागण्या-बोलण्यात कोणतीही घाई-गडबड किंवा चंचलता दिसत नाही. ते अगदी हळू आवाजात आणि शांतपणे बोलतात. त्यांची प्रत्येक कृती सावकाश असते. यातून त्यांच्या मनाची स्थिरता दिसून येते.
७. माझी वेळ झाल्यावर मी श्री. अनिरुद्ध यांना ‘निघतो’, असे सांगितले. मी पुन्हा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पू. वामन यांनी माझ्या पायांवर डोके टेकवून मला भावपूर्ण नमस्कार केला.
८. श्री. अनिरुद्ध हे मला त्यांच्या गाडीने आश्रमात सोडण्यास आले. तेव्हा पू. वामन हेही सोबत आले. गाडीत बसल्यावर ते लगेच ‘बाबा, श्रीकृष्णाचा जयघोष करूया’, असे म्हणाले. हे ऐकल्यावर ‘पू. वामन सर्व कृती कशा आध्यात्मिक स्तरावर करतात’, हे जाणवून त्यांचे पुष्कळ कौतुक वाटले.
अशा तर्हेने आज मला पू. वामन यांची प्रीती, नम्रता आणि आदरसत्कार अनुभवायला मिळाला अन् एवढ्या लहान वयात त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती आली.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.९.२०२१)