हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे नव्हे !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांचा देहली उच्च न्यायालयात युक्तीवाद

काय आहे कलम १५३ ?

चिथावणीखोर वक्तव्ये करून समाजाची शांतता भंग करणे, दंगल करणे या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ कलम अन्वये गुन्हा प्रविष्ट केला जातो.

नवी देहली – कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही. मी अत्यंत दायित्वतेने बोलत आहे की, जर न्यायालयाला वाटते की, ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा आहे, तर मी आरोपीच्या जामिनासाठी याचिका प्रविष्ट करणार नाही, असा युक्तीवाद हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी देहली उच्च न्यायालयात त्यांचे अशील प्रीत सिंह यांच्या बाजूने केला. काही आठवड्यांपूर्वी देहलीतील जंतर मंतर येथे प्रीत सिंह यांनी धरणे आंदोलन आयोजित केले होते. त्या वेळी काही जणांनी कथित आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्यामुळे प्रीत सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी मुख्य आयोजक असणारे भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांना जामीन संमत करण्यात आला आहे.

अधिवक्ता विष्णुशंकर जैन प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, माझ्या अशिलाने असे कोणतेही विधान केलेले नाही, ज्यामुळे त्यांच्या विरोधात कलम १५३ अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. धरणे आंदोलन दुपारी ११.४५ वाजता समाप्त झाले होते आणि तेथे दुपारी ४.४५ वाजता कथित आक्षेपार्ह घोषणाबाजी देण्यात आली. माझे अशील तेथे उपस्थितच नव्हते.