ठेकेदारामुळे गणेशभक्तांना त्रास होत असल्याचा माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा आरोप
कुडाळ – भंगसाळ नदीवर असलेला गणेश घाट (नदीपात्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी केलेली सोयीची जागा) तोडून गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असुविधा निर्माण करणार्या ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी केली आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कांदे म्हणतात, ‘‘कुडाळ शहर येथील भंगसाळ नदीवरील बंधार्याचे काम बरीच वर्षे रखडले होते. या बंधार्याच्या ठेकेदाराने काम करतांना कुडाळ नगरपंचायतीच्या अखत्यारित असणार्या गणेश घाटाची हानी केली आहे. बंधार्याचे काम करण्यासाठी जेसीबी यंत्र, इतर यंत्रे आणि डंपर या ठिकाणावरून नदीपात्रात उतरवली; मात्र काम झाल्यावर पुन्हा तो गणेश घाट सुस्थितीत करायचे सोडून हा ठेकेदार पसार झाला. वास्तविक सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्यावर प्रशासन गुन्हा नोंद करते; मग या ठेकेदाराला वेगळी वागणूक का दिली गेली ? ‘संबंधित ठेकेदाराकडून गणेश घाट सुस्थितीत करून घ्यावा’, याविषयी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन बरेच मास झाले; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शासकीय मालमत्तेची हानी केल्याच्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद झाला असता, तर आज गणेशभक्तांना श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी समस्यांना सामोरे जावे लागले नसते.’’