ही स्थिती कधी पालटणार ?

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेला पायाभूत सुविधा न मिळणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक 

आरुषीची प्रकृती खालावल्याने गावकर्‍यांनी ‘टायरच्या ट्यूब’वर बाज (खाट) ठेवून तिला आणि तिच्या आईला पैलतीरी नेले

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री नदीवर पूल नाही, त्यामुळे एका १३ वर्षीय आरुषी भिल हिला वैद्यकीय उपचार घेण्यास विलंब झाल्याने मृत्यू झाला. सात्री हे गाव तापी नदीवरील ‘पाडळसरे’ प्रकल्पामुळे २३ वर्षांपासून (वर्ष १९९७ पासून) पुनर्वसित म्हणून घोषित आहे; परंतु अजूनही त्या गावाचे पुनर्वसन सोयीसुविधांसह झालेले नाही. येथील नदीला पूर आला की, सात्री गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटतो. आरुषीला २ दिवसांपासून ताप होता. वैद्यांना गावात आणणेही शक्य नव्हते. नदीला पूर आल्याने नदी ओलांडून जाणे कुटुंबाला शक्य नव्हते. यामध्ये आरुषीची प्रकृती खालावल्याने गावकर्‍यांनी ‘टायरच्या ट्यूब’वर बाज (खाट) ठेवून तिला आणि तिच्या आईला पैलतीरी नेले; मात्र रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलीला प्राण गमवावे लागल्याचा आरोप करत कुटुंबाने मृतदेह प्रांत कार्यालयात आणून ‘या प्रकरणी दोषींवर गुन्हे नोंद केल्याविना अंत्यसंस्कार करणार नाही’, असा पवित्रा घेतला. ग्रामस्थांनी ‘दळणवळणाची ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही’, अशी भूमिका घेतली. अधिकार्‍यांनी समस्येवर उपाययोजना काढण्याचे आश्वासन दिले. मृतदेह माघारी सात्री येथे नेण्यासाठी प्रशासनाकडे होडीची मागणी केली. त्यावर प्रशासनाने ‘तालुक्यात डिझेल इंजिन असलेली होडी नाही’, असे सांगितले. शेवटी मृतदेह जसा आणला होता, तसाच सात्री गावात नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या पालकांना तिच्या मृत्यूनंतरही मानवी भावना मृत झाल्याप्रमाणे वागणूक देणार्‍या प्रशासनाविषयी काय बोलणार ?

दुसर्‍या दिवशी मात्र प्रांताधिकार्‍यांसह आरोग्य सेवेचे पथक, राज्य राखीव दलाचे ३७ पोलीस अत्याधुनिक बोटींसह नदी पार करत सात्री गावात दाखल झाले. आदल्या दिवशी बोट उपलब्ध नसतांना दुसर्‍या दिवशी कशी काय बोट उपलब्ध झाली ? ‘जनक्षोभ शमवण्यासाठीचा हा प्रशासनाचा आटापिटा होता का ?’, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असतांना दुसरीकडे खेडेगावांत अजूनही पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पदच आहे. ही स्थिती पालटायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणेच अपरिहार्य आहे !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव